
रत्नागिरी, 04 मे (हिं.स.) । पुणे जिल्ह्यातील भोरमधील नरसापूर परिसरात बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी अटक असलेल्या नराधमाला फाशी द्या अशी मागणी दापोलीतील निवेदिता प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन दापोलीच्या तहसीलदारांकडे दापोलीकरांनी बहुसख्येने उपस्थित राहून सादर केले. निवेदनात नसरापूर परिसरात बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. पोक्सो आणि महिला अत्याचार विरोधी कायद्यामध्ये सुधारणा करून कडक नियमांची अंमलबजावणी आणि अत्यंत तातडीचा निर्णय करण्याची प्रक्रिया करण्याबाबत कायद्यामध्ये सुयोग्य बदल घडवून आणावा अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशातील बालिका, कुमारिका, युवती, महिला, ज्येष्ठ महिला या सर्वांनाच संरक्षण मिळावे. मानसिक बदल घडवण्यासाठी विशेष कृतिदल स्थापन करावे. प्रत्येक पोलीस ठाण्यातील महिला सुरक्षा समिती अधिक गतिमान करून त्या समितीला अधिकारही देण्यात यावेत. प्रत्येक पोलीस ठाण्याप्रमाणेच गाव पातळीवर पोलीस पाटील अंतर्गत महिला सुरक्षा समिती स्थापन करून कार्यशाळा घेऊन एक कृती दल स्थापन करावे. पोक्सो आणि विनयभंग प्रकरणी ज्या आरोपींवर गुन्हा दाखल आहे व शिक्षा भोगत आहेत किंवा भोगली आहे, अशा आरोपींना दरमहा स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडे हजेरी लावणे अनिवार्य करावे. सरकारच्या सर्व सवलतींमधून त्यांना वगळण्यात यावे. महिला सुरक्षांसाठी जे मोबाइल क्रमांक दिले आहेत त्याचा प्रचार प्रसार अधिक मोठ्या प्रमाणावर करून सुरक्षा कवच निर्माण करणे आवश्यक आहे. अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी निवेदिता प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. प्रशांत परांजपे, मनसेचे सचिन गायकवाड, बेलोसे महाविद्यालयाच्या संचालिका जानकी बेलोसे, पतंजली योगशिक्षिका हर्षदा डोंगरे, योगशिक्षक शैलेश आठल्ये, प्राजक्ता कार्ले, ऋतुजा गोडबोले यांनी आपल्या मनोगतातून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. निवेदन सादर करण्यासाठी निवेदिता प्रतिष्ठानचे महेश्वरी विचारे, शीतल देवरूखकर यांच्यासह दापोलीतील महिला, व्यापारी, युवक,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी