
लातूर, 06 मे, (हिं.स.)। लातूर शहरात निर्माण झालेल्या पेट्रोल टंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांना निवेदन देण्यात आले. वाढत्या टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या प्रश्नावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनात पुरवठा अधिकाऱ्यांनी तसेच पेट्रोल पंप चालकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित योग्य त्या सूचना व नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली. पेट्रोल पुरवठा सुरळीत न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या प्रसंगी भाजयुमो जिल्हाध्यक्ष ओम आप्पा धरणे, सरचिटणीस अक्षय स्वामी, उपाध्यक्ष गणेश बेद्रे, विद्यार्थी आघाडी प्रभारी पृथ्वीराज शिंदे, मंडलाध्यक्ष ऋषिकेश झुंजे पाटील, चिटणीस पवन खोबरे, सोहम देवरसे, कोषाध्यक्ष प्रसाद जगताप, डॉ. अभिषेक धर्माधिकारी यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis