
मुंबई, 01 जून (हिं.स.)। अभिनेता अली फजलच्या बहुप्रतिक्षित वेब सीरिज 'राख'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रोसित रॉय दिग्दर्शित ही रहस्यमय क्राईम थ्रिलर सीरिज अनुषा नंदकुमार आणि संदीप साकेत यांनी लिहिली आहे. सोनाली बेंद्रे, राकेश बेदी आणि आमिर बशीर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ट्रेलरच्या प्रदर्शनाने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.
ट्रेलरची सुरुवात अली फजलच्या एसआय जयप्रकाश या दिल्ली पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेने होते, जो दोन बेपत्ता मुलांच्या प्रकरणाचा तपास करत असतो. तपासादरम्यान, तो मुलांच्या कुटुंबीयांची चौकशी करतो आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या दबावाशी संघर्ष करतो. जसजशी कथा पुढे सरकते, तसतसे हे प्रकरण एका साध्या बेपत्ता होण्यापासून ते अपहरण, रहस्य आणि अनेक धक्कादायक गुपितांपर्यंत पोहोचते, ज्यामुळे ट्रेलरमधील उत्कंठा आणखी वाढते.
वृत्तानुसार, 'राख'ची कथा १९७८ च्या चर्चित असलेल्या गीता आणि संजय चोप्रा अपहरण आणि हत्या प्रकरणावरून प्रेरित असल्याचे म्हटले जात आहे. तथापि, निर्मात्यांकडून याला कोणतीही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. गुन्हेगारी, रहस्य आणि भावनिक संघर्षाने परिपूर्ण असलेली ही मालिका १२ जून रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule