कतारच्या मध्यस्थीने अमेरिका-इराण संवादाला गती; स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय बैठक
बर्न , 21 जून (हिं.स.)।स्वित्झर्लंडमधील ल्यूसर्न शहराजवळील ब्युर्गेनस्टॉक येथे राजनैतिक घडामोडींना वेग आला आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी आपल्या स्विस समकक्ष इग्नाझिओ कॅसिस यांच्यासोबत अत्यंत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक घेतली. अमे
कतारच्या मध्यस्थीने अमेरिका-इराण संवादाला गती; स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय बैठक


बर्न , 21 जून (हिं.स.)।स्वित्झर्लंडमधील ल्यूसर्न शहराजवळील ब्युर्गेनस्टॉक येथे राजनैतिक घडामोडींना वेग आला आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी आपल्या स्विस समकक्ष इग्नाझिओ कॅसिस यांच्यासोबत अत्यंत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक घेतली. अमेरिका आणि इराण यांच्यात होणाऱ्या शांतता चर्चेपूर्वीच झालेल्या या बैठकीमुळे दोन्ही देशांतील उच्चस्तरीय चर्चेसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, स्वित्झर्लंड सरकारने अमेरिकन शिष्टमंडळाचे उत्साहात स्वागत केले आहे.

स्विस परराष्ट्र मंत्रालयाने ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे याची पुष्टी केली. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या १४ कलमी सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीसाठी हे अमेरिकन शिष्टमंडळ येथे दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. या संवेदनशील आणि तांत्रिक स्वरूपाच्या चर्चेसाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स स्वित्झर्लंडमध्ये पोहोचले असून, त्यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या द्वितीय महिला उषा व्हान्स याही या दौऱ्यात सहभागी झाल्या आहेत. अमेरिकन शिष्टमंडळात विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर यांचाही समावेश आहे. वॉशिंग्टनहून रवाना होण्यापूर्वी व्हान्स यांनी पत्रकारांशी संवाद साधला. इराणी शिष्टमंडळ आधीच स्वित्झर्लंडमध्ये पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, ही चर्चा पुढील काही दिवस सुरू राहू शकते. अणु कार्यक्रम आणि लेबनॉनमधील युद्धविरामाशी संबंधित मुद्द्यांवर सकारात्मक प्रगती होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दुसरीकडे, इराणनेही चर्चेसाठी पूर्ण तयारी केली आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष आणि प्रमुख वाटाघाटीकार मोहम्मद बाघेर गालिबाफ हे इराणी शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, या शिष्टमंडळाला ‘मीनाब १६८’ असे नाव देण्यात आले असून, मीनाब शाळा दुर्घटनेतील पीडितांच्या स्मरणार्थ हे नाव ठेवण्यात आले आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी गेल्या बुधवारी व्हर्च्युअल माध्यमातून १४ कलमी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. या कराराचा मुख्य उद्देश दोन्ही देशांतील वैरभाव संपुष्टात आणणे हा असून, होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणे आणि इराणच्या अणु कार्यक्रमाबाबत व्यापक चर्चा सुरू करणे हे त्यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत कतार महत्त्वाची मध्यस्थाची भूमिका बजावत आहे. कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी शुक्रवारीच स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले असून, दोन्ही देशांमधील राजनैतिक संपर्क सुलभ करण्याचे काम कतारकडून केले जात आहे.मात्र, राजनैतिक चर्चांबरोबरच प्रत्यक्ष परिस्थिती अद्याप तणावपूर्णच आहे. लेबनॉनमध्ये युद्धविरामाचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केली आहे. लेबनॉनमधील युद्धविराम हा या कराराचा महत्त्वाचा भाग असल्याचे इराणचे म्हणणे आहे.

अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या नव्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रविवारी अणु करारासंदर्भातील पहिल्या फेरीच्या चर्चेला सुरुवात होण्याची पूर्ण शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande