
टोरंटो (कॅनडा), 24 जून (हिं.स.) : लुका मॉड्रिच हा २०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पहिला क्रोएशियन आणि पुरुष फुटबॉलच्या इतिहासातील केवळ चौथा फुटबॉलपटू ठरला आहे. फिफा विश्वचषक २०२६ च्या 'ग्रुप एल'मधील पनामाविरुद्धच्या सामन्यात क्रोएशियाने १-० असा विजय मिळवला. या सामन्या दरम्यान त्याने हा टप्पा गाठला.
२०१८ च्या फिफा विश्वचषक स्पर्धेत क्रोएशियाचे नेतृत्व करणाऱ्या मॉड्रिचने १ जून २००६ रोजी वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले होते. गेल्या दोन दशकांहून अधिक काळात त्याने आपल्या राष्ट्रीय संघासाठी २९ गोल केले आहेत आणि तो क्रोएशियाच्या मिडफील्ड रचनेतील एक महत्त्वाचा फुटबॉलपटू आहे.
या दिग्गज फुटबॉलपटू यादीत पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आघाडीवर आहे (२३० सामने), त्यानंतर कुवेतचा बादर अल-मुतावा (२०२ सामने) आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी (२०१ सामने) यांचा क्रमांक लागतो. आता २०० सामन्यांसह मॉड्रिच एकूण चौथ्या स्थानावर पोहोचला असून, २०० सामन्यांचा टप्पा गाठणाऱ्या या प्रतिष्ठित गटात सामील होणारा तो एकमेव क्रोएशियन फुटबॉलपटू ठरला आहे.
दरम्यान, टोरंटो येथे झालेल्या फिफा विश्वचषक २०२६ च्या 'ग्रुप एल' सामन्यात क्रोएशियाने पनामावर १-० असा महत्त्वपूर्ण विजय मिळवला आणि बाद फेरीतील आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. सामन्यातील निर्णायक क्षण उत्तरार्धात आला, जेव्हा बदली फुटबॉलपटू अँटे बुदिमिरने सामन्यातील एकमेव गोल केला. यामुळे क्रोएशियाला त्यांच्या सुरुवातीच्या पराभवानंतर सावरण्यास मदत झाली.
पनामाने शिस्तबद्ध बचाव आणि पहिल्या हाफमध्ये दमदार कामगिरी केली असली तरी, त्यांना मिळालेल्या संधींचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही आणि अखेरीस त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निकालामुळे क्रोएशियाला स्पर्धेतील पहिले गुण मिळाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे