आयसीसी क्रमवारी : शुभमन गिल एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी
-शुभमन गिल आणि इशान किशनची एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप -जो रूट पुन्हा एकदा कसोटी फलंदाजीत अव्वल स्थानी - कसोटीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री जसप्रीत बुमराहसह अग्रस्थानी नवी दिल्ली, 24 जून (हिं.स.)सर्व फॉरमॅटमधील प्रभावी कामगिरीमुळे, भारती
शुभमन गिल


-शुभमन गिल आणि इशान किशनची एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप -जो रूट पुन्हा एकदा कसोटी फलंदाजीत अव्वल स्थानी - कसोटीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री जसप्रीत बुमराहसह अग्रस्थानी

नवी दिल्ली, 24 जून (हिं.स.)सर्व फॉरमॅटमधील प्रभावी कामगिरीमुळे, भारतीय सलामीवीर शुभमन गिलने ताज्या आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे. दरम्यान, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने कसोटी गोलंदाजी क्रमवारीत भारताच्या जसप्रीत बुमराहसोबत अव्वल स्थान विभागून पटकावले आहे.

कसोटी फलंदाजी क्रमवारीतही अव्वल स्थानी मोठे बदल दिसून आले आहेत. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले आहे. न्यूझीलंडविरुद्ध ४६ आणि ७७ धावांच्या खेळीमुळे रूटने दोन स्थानांची झेप घेतली आहे. त्याने सहकारी हॅरी ब्रूक आणि ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड यांना मागे टाकत आपल्या कारकिर्दीत १२व्यांदा अव्वल स्थान पटकावले आहे.

शुभमन गिलने तीन स्थानांची झेप घेत एकदिवसीय फलंदाजांमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे. तो आता अव्वल क्रमांकावरील डॅरिल मिचेलपेक्षा केवळ २४ रेटिंग पॉइंट्सने मागे आहे. भारताच्या इशान किशननेही लक्षणीय प्रगती केली असून, एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत २१ स्थानांची झेप घेत तो संयुक्त ४३ व्या स्थानावर पोहोचला आहे.

अफगाणिस्तानविरुद्धची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही क्रमवारीत सुधारणा केली आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग एकदिवसीय गोलंदाजांमध्ये १६ स्थानांनी वर चढून २२ व्या स्थानावर पोहोचला आहे. प्रसिद्ध कृष्णाने ३४ स्थानांची झेप घेत संयुक्त ५८ वे स्थान पटकावले आहे, तर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने १७ स्थानांची झेप घेत याच यादीत संयुक्त ७१ वे स्थान मिळवले आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज मॅट हेन्री हा कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचणारा न्यूझीलंडचा केवळ तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. ओव्हल येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सामना जिंकून देणारे ११ बळी घेतल्यानंतर त्याने भारताच्या जसप्रीत बुमराहची बरोबरी करत अव्वल स्थान पटकावले आहे.

नोव्हेंबर २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाला मागे टाकल्यापासून बुमराह क्रमवारीत अव्वल स्थानी होता. पण हेन्रीच्या प्रभावी कामगिरीमुळे न्यूझीलंडला इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवता आली, ज्यामुळे त्यांना अव्वल स्थान विभागून घेण्याची संधी मिळाली.

हेन्री आता जॅक कोवी आणि न्यूझीलंडचे दिग्गज रिचर्ड हॅडली यांच्या पंक्तीत सामील झाला आहे. हेन्रीचे सध्याचे रेटिंग ८७० गुण आहेत. आयसीसी क्रमवारीच्या इतिहासात न्यूझीलंडच्या केवळ दोन क्रिकेटपटूंनी ओलांडले आहे. हॅडली यांनी १९८५ मध्ये ९०९ गुण मिळवले होते आणि माजी कर्णधार केन विल्यमसनने २०२१ मध्ये ९१९ चे फलंदाजी रेटिंग मिळवले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande