म्हाडा पुणे मंडळातर्फे ७९२ सदनिकांच्या विक्रीसाठी २५ जून रोजी संगणकीय सोडत  
* अल्प व मध्यम उत्पन्न गटातील ७९२ सदनिकांसाठी १४२२ अर्ज मुंबई, 24 जून (हिं.स.) - म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे येथील ताथवडे टप्पा -२ गृहनिर्माण योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील २४ व मध्यम उत्पन्न गटातील ७६८ सदनिका अश
म्हाडा


* अल्प व मध्यम उत्पन्न गटातील ७९२ सदनिकांसाठी १४२२ अर्ज

मुंबई, 24 जून (हिं.स.) - म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे येथील ताथवडे टप्पा -२ गृहनिर्माण योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील २४ व मध्यम उत्पन्न गटातील ७६८ सदनिका अशा एकूण ७९२ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत दिनांक २५ जून २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता पुणे मंडळाचे सभापती श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते पुणे मंडळाच्या आगरकर नगर येथील कार्यालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे काढण्यात येणार आहे. ७९२ सदनिकांसाठी १४२२ अर्ज प्राप्त झाले आहेत.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ताथवडे पुणे टप्पा - २ गृहनिर्माण योजनेअंतर्गत २४ सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रति सदनिकेची किंमत ४६ ते ४७ लाख रुपये दरम्यान असून बांधकामाचे क्षेत्रफळ ७५.९६ ते ७७.९९ चौरस मीटर आहे. याच प्रकल्पात मध्यम उत्पन्न गट योजनेअंतर्गत ७६८ सदनिका असून प्रति सदनिकेची किंमत ६४.५० ते ६५.५० लाख रुपये दरम्यान आहे व बांधकामाचे क्षेत्रफळ ८९.१५ ते ९१.१८ चौरस मीटर आहे.

सदर गृहनिर्माण प्रकल्पात प्रत्येक सदनिकेसाठी मोफत फोर व्हिलर पार्किंग, स्विमिंग पुल, इनडोअर गेम एरिया, मुलांसाठी खेळण्याची जागा (उपकरणांसह), सोलार ऑन-ग्रिड, ईव्ही चार्जिंग, क्लब हाऊस, ओपन जिम, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी अत्याधुनिक सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सदर योजना मुंबई-पुणे महामार्गालगत असून सुसज्ज इमारतीचे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.

सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या वेबकास्टिंगद्वारे थेट प्रक्षेपण (Live Telecast) म्हाडाच्या अधिकृत @mhadaofficial या यूट्यूब चॅनलवरून व फेसबूक चॅनलवर करण्यात येणार आहे. यूट्यूबवरील थेट प्रक्षेपण बघण्यासाठी https://youtube.com/live/uyOzf2-ECbU?feature=share या लिंकवर क्लिक करण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande