विलास घुलेच्या मृत्यू प्रकरणाचा दबावाशिवाय तपास करा; मुंडे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश
बीड, 24 जून, (हिं.स.)। विलास घुलेच्या मृत्यू प्रकरणाचा दबावाशिवाय तपास करा असे पंकजा मुंडे यांनी पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले आहेत. केज तालुक्यातील टाकळी - कदमवाडी परिसरात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले या निष्पाप तरुणाच्या मृत्यूची घटना
विलास घुलेच्या मृत्यू प्रकरणाचा दबावाशिवाय तपास करा; मुंडे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश


बीड, 24 जून, (हिं.स.)। विलास घुलेच्या मृत्यू प्रकरणाचा दबावाशिवाय तपास करा असे पंकजा मुंडे यांनी पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले आहेत. केज तालुक्यातील टाकळी - कदमवाडी परिसरात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले या निष्पाप तरुणाच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी आहे. या प्रकरणात पोलिसांनी कोणत्याही राजकीय किंवा बाह्य दडपणाला बळी न पडता दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना दिल्या आहेत.

या संवेदनशील घटनेबाबत पंकजा मुंडे यांनी पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून विस्तृत चर्चा करून माहिती घेतली. ज्याचा घटनेशी काहीही संबंध नव्हता, अशा तरुणाला हकनाक प्राण गमवावे लागणे ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. पीडित कुटुंबाला पूर्ण न्याय मिळवून देण्यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच मृत तरुणाच्या कुटुंबाने प्रशासनावर विश्वास ठेवून सहकार्य करावे आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. पोलीस प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करत असून दोषींना पाठीशी घातले जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande