
बीड, 24 जून (हिं.स.)। परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पोहनेर-सिरसाळा-मोहा-गर्देवाडी हा ३४ किलोमीटरचा राज्य रस्ता आता सिमेंट काँक्रिटचा होणार असून, या संपूर्ण रस्त्याच्या दुरुस्ती व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ३४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. माजी मंत्री व स्थानिक आमदार धनंजय मुंडे यांनी केलेल्या सततच्या मागणी आणि पाठपुराव्याला या निमित्ताने यश आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमध्ये या कामाला अधिकृत मंजुरी दिली. परळी तालुक्यातील ग्रामीण दळणवळण आणि वाहतुकीच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत कळीचा मानला जातो. धनंजय मुंडे यांनी आपल्या निवडणूक घोषणापत्रात या रस्त्याच्या विकासाचे आश्वासन दिले होते. या मंजुरीनंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांचे आभार मानले आहेत. निधी उपलब्ध झाल्यामुळे आता लवकरच पोहनेर येथील नदीवरील पुलापासून ते गर्देवाडीपर्यंतच्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू होणार असून, ग्रामीण भागातील दळणवळणाची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.
------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis