मोर्शी नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्याची मागणी
अमरावती, 24 जून (हिं.स.) | मोर्शी शहरातील विविध नागरी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, त्या सोडविण्यासाठी मोर्शी नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करण्याची मागणी नागरिकांसह नगरसेवकांकडून जोर धरत आहे. सध्या नगरपरिषदेत कार्यरत असलेले प्
कधी मिळणार कायमस्वरूपी मुख्याधिकारी?


अमरावती, 24 जून (हिं.स.) | मोर्शी शहरातील विविध नागरी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, त्या सोडविण्यासाठी मोर्शी नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करण्याची मागणी नागरिकांसह नगरसेवकांकडून जोर धरत आहे.

सध्या नगरपरिषदेत कार्यरत असलेले प्रभारी मुख्याधिकारी आठवड्यातून केवळ एक ते दोन दिवसच उपस्थित राहू शकत असल्याने अनेक प्रशासकीय कामे प्रलंबित राहात आहेत. त्यातच मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी कर्मचारी स्तरावर होत नसल्याची चर्चा नगरपरिषद परिसरात सुरू आहे. परिणामी, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नगरसेवकांना वारंवार नगरपरिषद कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. शहरातील विविध प्रभागांतील नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नगरसेवक सातत्याने पाठपुरावा करीत असले, तरीही अनेक कामे रखडत असल्याने नगरसेवकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरसेवकांचीच कामे होत नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मोर्शी शहरात घंटागाड्यांची कमतरता असल्याने अनेक भागांत दोन ते तीन दिवस कचरा संकलन होत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांना घरातच कचरा साठवून ठेवावा लागत असून, अस्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याशिवाय शहरातील रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याच्या समस्या, जलतरण तलावासंबंधीचे प्रश्न आदी अनेक नागरी प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. वारंवार तक्रारी करूनही समस्यांचे निराकरण होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रलंबित कामांना गती देण्यासाठी मोर्शी नगरपरिषदेला पूर्णवेळ व कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिक, नगरसेवक आणि विविध सामाजिक स्तरातून होत आहे. याकडे स्थानिक आमदार व शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन मोर्शी नगरपरिषदेला तातडीने कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्यावा, अशी मागणी शहर वासीयांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande