ॲमेझॉनची भारतात 2030 पर्यंत 48 डॉलरची अब्ज गुंतवणूक करण्याची घोषणा
नवी दिल्ली , 25 जून (हिं.स.)।जगातील आघाडीची ई-कॉमर्स आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ॲमेझॉनने गुरुवारी भारतात 2026 ते 2030 या कालावधीत 48 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी पंतप्रध
ॲमेझॉनची भारतात 2030 पर्यंत 48 डॉलरची अब्ज गुंतवणूक करण्याची घोषणा


नवी दिल्ली , 25 जून (हिं.स.)।जगातील आघाडीची ई-कॉमर्स आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ॲमेझॉनने गुरुवारी भारतात 2026 ते 2030 या कालावधीत 48 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा केली.

अँडी जेसी म्हणाले, “2010 पासून आजपर्यंत आम्ही भारतात 40 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस आम्ही 2026 ते 2030 या कालावधीत 35 अब्ज डॉलर गुंतवण्याची घोषणा केली होती. आता ही रक्कम वाढवून 48 अब्ज डॉलर करण्यात आली आहे.”भारताच्या वेगाने वाढणाऱ्या डिजिटल अर्थव्यवस्थेतील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ॲमेझॉनची ही गुंतवणूक महत्त्वाची ठरणार आहे.

या नव्या घोषणेनंतर 2010 ते 2030 या कालावधीत भारतातील ॲमेझॉनची एकूण आर्थिक बांधिलकी 88 अब्ज डॉलरपेक्षा अधिक होणार आहे. ही गुंतवणूक ई-कॉमर्स नेटवर्क, जलद वितरण सेवा (क्विक कॉमर्स) आणि तंत्रज्ञानविषयक पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी वापरली जाणार आहे.

भारताच्या प्रगतीचा उल्लेख करताना अँडी जेसी यांनी गेल्या 12 वर्षांतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. ते म्हणाले की, भारत आज जगातील जवळपास प्रत्येक क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधानांकडे स्पष्ट दृष्टीकोन आहे.या वाढीव गुंतवणुकीमागे भारतातील डिजिटल अर्थव्यवस्थेत वाढणारी मागणी हे प्रमुख कारण आहे. कंपनीने आपल्या संसाधन वाटप योजनेत वाढ केली असून, या भांडवलाचा मोठा हिस्सा अत्याधुनिक डिजिटल प्रणालींच्या विकासासाठी खर्च केला जाणार आहे.

अतिरिक्त 13 अब्ज डॉलरची गुंतवणूक क्लाउड संगणन (क्लाउड कॉम्प्युटिंग) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्राच्या विकासासाठी केली जाणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील एकूण नियोजित गुंतवणूक 21 अब्ज डॉलरहून अधिक होईल.ही रक्कम मुंबई आणि हैदराबाद येथील ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्ल्यूएस)च्या डेटा सेंटर क्षमतेच्या विस्तारासाठी वापरली जाणार आहे.

अँडी जेसी यांनी सांगितले की, कंपनीच्या एकूण गुंतवणुकीतील मोठा हिस्सा ई-कॉमर्स व्यवसायासाठी आहे. मात्र, नव्याने जाहीर करण्यात आलेली 13 अब्ज डॉलरची अतिरिक्त गुंतवणूक क्लाउड संगणन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांवर केंद्रित असेल.त्यांच्या मते, भारत जगातील महत्त्वाच्या क्लाउड संगणन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रांपैकी एक म्हणून उदयास येत आहे. या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे कंपनी भविष्यातही सातत्याने गुंतवणूक करत राहणार आहे.

ही गुंतवणूक भारताच्या तांत्रिक प्रगतीला गती देण्याबरोबरच रोजगारनिर्मितीलाही चालना देईल. कंपनीचे उद्दिष्ट 2024 मध्ये समर्थित 28 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांची संख्या 2030 पर्यंत सुमारे 38 लाखांपर्यंत वाढवण्याचे आहे.याशिवाय, 2030 पर्यंत 80 अब्ज डॉलर मूल्याच्या एकत्रित ई-कॉमर्स निर्यातीला चालना देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच, 1.5 कोटी लघु उद्योजकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे उपलब्ध करून दिले जातील आणि 40 लाख सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण दिले जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande