
मुंबई, 25 जून, (हिं.स.)। अॅक्सिस बँकेचा प्रायव्हेट बँकिंग व्यवसाय बरगंडी प्रायव्हेट आणि हुरुन इंडिया यांनी आज एकत्रितपणे '२०२५ बरगंडी प्रायव्हेट हुरुन इंडिया ५००' ही यादी जाहीर केली. भारतातील सर्वात अव्वल ५०० कंपन्यांच्या या यादीचे हे पाचवे एडिशन आहे. या कंपन्यांचे एकूण सामूहिक मूल्य ३.४ ट्रिलियन डॉलर आहे. या मूल्यामधून कॉर्पोरेट लँडस्केप दिसून येते, जिथे केवळ व्यावसायिक व्याप्तीच वाढलेली नाही, तर उद्योजकतेतील वाढता सहभाग, अधिक प्रबळ मूलभूत आर्थिक घटक आणि पारंपारिक विकास केंद्रांच्या पलीकडे विस्तारलेली उपस्थिती देखील पाहायला मिळत आहे.
पाचव्या एडिशनमध्ये २०२५ बरगंडी प्रायव्हेट हुरुन इंडिया ५०० च्या यादीत भारतातील मुख्य कार्यालय असलेल्या कंपन्यांची त्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशन (बाजार भांडवल) किंवा एंटरप्राइझ व्हॅल्यूच्या (व्यावसायिक मूल्य) आधारे वर्गवारी करण्यात आली आहे, यात सरकारी मालकीचे उपक्रम आणि उपकंपन्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. २०२५ च्या यादीत समाविष्ट होण्यासाठी कंपन्यांचे किमान मूल्यांकन ३० एप्रिल २०२६ रोजी १०,२३० कोटी रुपये (१.१ अब्ज अमेरिकन डॉलर) असणे आवश्यक होते. ही किमान मूल्यांकनाची मर्यादा गेल्या वर्षीच्या तुलनेत ७ टक्क्यांनी वाढली आहे.
सरासरी ४४ वर्षे वयोमान असलेला हा कंपन्यांचा समूह भारताच्या कॉर्पोरेट परिसंस्थेतील परिपक्वता आणि गती यांचे उत्कृष्ट संयोजन निदर्शनास आणतो. एकत्रितपणे या कंपन्या देशाच्या आर्थिक रचनेला दृढ करत आहेत, तसेच ८.९ दशलक्ष व्यक्तींना रोजगार पुरवत आहेत, करांच्या स्वरूपात ३.२३ लाख कोटी रुपयांचे योगदान देत आहेत आणि सीएसआर उपक्रमांमध्ये १३,४३३ कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहेत.
या लाँचबाबत मत व्यक्त करत अॅक्सिस बँकेच्या कार्ड्स, पेमेंट्स आणि वेल्थ मॅनेजमेंटच्या ग्रुप हेड अर्निका दीक्षित म्हणाल्या: भारतातील ५०० सर्वात मौल्यवान कंपन्यांचा गौरव करताना बरगंडी प्रायव्हेटला पुन्हा एकदा हुरुन इंडियासोबत भागीदारी करण्याचा अभिमान वाटत आहे. २०२५ बरगंडी प्रायव्हेट हुरुन इंडिया ५०० अहवाल हा भारताच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील स्थिर आणि निरंतर विकासाचा टप्पा दर्शवतो, जिथे कंपन्या बाजारपेठेतील विविध चक्रांनुसार स्वतःला जुळवून घेत, गुंतवणूक करत आणि आपले महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत आपला विस्तार करत आहेत. मूल्यनिर्मितीचे घटक आता अधिकाधिक वैविध्यपूर्ण होत चालले आहेत आणि प्रगतीचा हा वेग केवळ पारंपारिक केंद्रांपुरता मर्यादित न राहता अधिक व्यापक व वैविध्यपूर्ण व्यवसाय आणि बाजारपेठांपर्यंत पोहोचत आहे, हे आता स्पष्टपणे दिसून येत आहे.
अॅक्सिस बँकेमध्ये, भांडवलाची उभारणी कशा प्रकारे केली जात आहे आणि नवीन संधी कशा तयार होत आहेत, यावरून आम्हाला हा बदल अधिक स्पष्टपणे जाणवत आहे. बरगंडी प्रायव्हेटच्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्राहकांना महत्त्वपूर्ण गुंतवणूक संधींचा लाभ घेण्यास सक्षम करतो आणि त्यांना विशेष व वैयक्तिकृत संपत्ती व्यवस्थापन पर्याय देण्यासाठी आमच्या 'वन अॅक्सिस' परिसंस्थेचा वापर करतो. मे २०२६ पर्यंत आमची एकूण एयूएम वार्षिक आधारावर १५ टक्क्यांच्या वाढीसह २७ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. आम्ही भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांचे विश्वासू भागीदार म्हणून कायम आहोत. तसेच उदयोन्मुख कंपन्या, उद्योजकीय परिसंस्था आणि मोठ्या शहरांच्या पलीकडील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन संपत्ती निर्माण होत असल्याचे आम्हाला दिसत आहे, जे भारताच्या विकासाचा पुढील टप्पा निश्चित करत आहे. आम्ही या बदलत्या परिदृश्यात सेवा देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत आणि भारताच्या संपत्ती निर्मात्यांच्या महत्त्वाकांक्षांना पाठबळ देण्यासाठी आवश्यक असलेली पोहोच, सखोल ज्ञान आणि क्षमता प्रदान करत आहोत.
हुरुन इंडियाचे फाउन्डर आणि चिफ रिसर्चर अनस रहमान जुनैद म्हणाले: २०२५ बरगंडी प्रायव्हेट हुरुन इंडिया ५०० मधील कंपन्या भारताच्या खाजगी क्षेत्राचा मुख्य कणा आहेत आणि देशावर मोठा आर्थिक प्रभाव पाडतात. एकत्रितपणे त्यांचे एकूण मूल्यांकन ३.४ ट्रिलियन अमेरिकन डॉलर आहे, जे कॅनडाच्या जीडीपीपेक्षा, तसेच इंडोनेशिया आणि स्पेनच्या एकत्रित जीडीपीपेक्षाही जास्त आहे आणि या कंपन्या ८.९ दशलक्ष व्यक्तींना रोजगार देतात. तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्था कशी विकसित होत आहे हे समजून घ्यायचे असेल, तर भारतातील ५०० सर्वात मौल्यवान कंपन्यांमागील गाथा त्यासाठी उत्तम आणि प्रभावी केंद्रबिंदू ठरू शकतात.
२०२५ बरगंडी प्रायव्हेट हुरुन इंडिया ५०० अहवाल अवघ्या चार वर्षांत भारताच्या अर्थव्यवस्थेत झालेल्या मोठ्या बदलांवर प्रकाश टाकतो. यंदा ९५ नवीन कंपन्यांनी या यादीत प्रवेश केला आहे, जी या यादीच्या इतिहासातील सर्वोच्च संख्या आहे, तर दुसरीकडे २०२१ च्या पहिल्या एडिशनमधील एक तृतीयांशपेक्षा जास्त कंपन्या या यादीतून बाहेर पडल्या आहेत. या बदलांचे विश्लेषण केल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेला नवा आकार देणाऱ्या रचनात्मक बदलांचे स्पष्ट चित्र आपल्यासमोर उभे राहते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर