आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एचडीएफसी लाईफच्या प्रीमियममध्ये १२ टक्के वाढ, निव्वळ नफा ₹१,९१० कोटी
* रिटेल प्रोटेक्शन व्यवसायात ४३ टक्के वाढ; क्लेम सेटलमेंट रेशो ९९.८ टक्के, GenAI आणि डिजिटल तंत्रज्ञानावर भर मुंबई, 25 जून (हिं.स.) - एचडीएफसी लाईफने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एकूण प्रीमियम उत्पन्नात (रिन्युअल प्रीमियमसह) १२ टक्के वार्षिक वाढ नोंद
केकी एम. मिस्त्री


* रिटेल प्रोटेक्शन व्यवसायात ४३ टक्के वाढ; क्लेम सेटलमेंट रेशो ९९.८ टक्के, GenAI आणि डिजिटल तंत्रज्ञानावर भर

मुंबई, 25 जून (हिं.स.) - एचडीएफसी लाईफने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एकूण प्रीमियम उत्पन्नात (रिन्युअल प्रीमियमसह) १२ टक्के वार्षिक वाढ नोंदवली असून, नव्या व्यवसायातील १०.८ टक्के बाजारहिस्स्यासह देशातील अव्वल तीन जीवन विमा कंपन्यांमधील आपले स्थान कायम राखले आहे. कंपनीचे अध्यक्ष केकी एम. मिस्त्री यांनी भागधारकांना उद्देशून दिलेल्या संदेशात ही माहिती दिली आहे.

कंपनीचा करानंतरचा निव्वळ नफा (PAT) आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ₹१,९१० कोटी इतका राहिला. व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) ₹३.७५ लाख कोटींवर, तर एम्बेडेड व्हॅल्यू ₹६२,१३९ कोटींवर पोहोचली. याच कालावधीत कंपनीच्या रिटेल प्रोटेक्शन व्यवसायात ४३ टक्क्यांची भक्कम वाढ झाली असून, नफाक्षमता आणि शाश्वत वाढीवर कंपनीचा भर कायम असल्याचे मिस्त्री यांनी सांगितले.

कंपनीने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये वैयक्तिक आणि समूह अशा दोन्ही विभागांचा मिळून ९९.८ टक्के क्लेम सेटलमेंट रेशो साध्य केला. ग्राहकांना विश्वासार्ह सेवा आणि आर्थिक सुरक्षितता देण्याच्या वचनबद्धतेचे हे द्योतक असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

जीवन विमा क्षेत्रासाठी सरकारने वैयक्तिक जीवन विमा उत्पादनांवरील जीएसटी हटविण्याचा निर्णय तसेच एप्रिल २०२६ पासून IFRS लेखापद्धतीची अंमलबजावणी हे दोन महत्त्वाचे बदल केल्याचे मिस्त्री यांनी नमूद केले. त्यामुळे विमा उत्पादने अधिक परवडणारी होतील, उद्योगातील पारदर्शकता वाढेल आणि दीर्घकालीन वाढीस चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी कंपनी अॅडव्हान्स्ड अॅनालिटिक्स, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, ऑटोमेशन आणि जनरेटिव्ह एआय (GenAI) आधारित तंत्रज्ञानामध्ये सातत्याने गुंतवणूक करत असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे जोखीम व्यवस्थापन, कार्यक्षमता आणि निर्णयप्रक्रियेत अधिक वेग आणि अचूकता साध्य होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, कंपनीने आर्थिक संरक्षण, बचत, निवृत्ती नियोजन आणि वेलनेस या सर्व क्षेत्रांमध्ये उत्पादनांमध्ये सातत्याने नवकल्पना बाजारात उतरवल्या असून, स्वतःचे एजंट मार्फत होणारे वितरण आणि डिजिटल वितरण माध्यम अधिक मजबूत केले आहेत.

कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल एचडीएफसी लाईफला इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर अॅडव्हायजरी सर्व्हिसेस (IiAS) यांच्या 'लीडरशिप' श्रेणीत मानांकन मिळाल्याची माहितीही मिस्त्री यांनी दिली.

भूराजकीय तणाव आणि जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही भारताची अर्थव्यवस्था सक्षम राहील, तसेच वाढती आर्थिक जागरूकता, अनुकूल लोकसंख्या रचना आणि विकसित होत असलेली नियामक व्यवस्था यामुळे भारतीय जीवन विमा उद्योगाच्या दीर्घकालीन वाढीबाबत आपण आशावादी असल्याचे मिस्त्री यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande