
नवी दिल्ली, 25 जून (हिं.स.) । भारताच्या १९८३ च्या एकदिवसीय विश्वचषकातील ऐतिहासिक विजयाला ४३ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा एक असा ऐतिहासिक क्षण होता ज्याने भारतीय क्रिकेटचे चित्रच बदलून टाकले. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली, २५ जून १९८३ रोजी लॉर्ड्सवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करून सर्वांचे अंदाज खोटे ठरवले आणि अनपेक्षित विजय मिळवला.
हा विजय अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. या विजयाने क्रिकेटला देशातील एक प्रचंड लोकप्रिय खेळ बनवले आणि जागतिक क्रिकेटमध्ये भारताच्या वर्चस्वाची पायाभरणी केली. कपिल देव यांच्या संघाने विजेतेपद मिळवताना, त्या स्पर्धेत विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजवर अविश्वसनीय विजय संपादन केला.
१९७५ आणि १९७९ च्या विश्वचषकात भारताची कामगिरी निराशाजनक होती आणि संघ साखळी फेरीच्या पुढे जाऊ शकला नव्हता. मात्र, त्यानंतरच्या या मोठ्या स्पर्धेत (१९८३) भारताने आपल्या प्रभावी कामगिरीने क्रिकेट विश्वाला चकित केले. याउलट, १९७५ आणि १९७९ चे मागील दोन विश्वचषक जिंकल्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ अंतिम सामन्यात उतरताना विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता.
कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला केवळ १८३ धावा करता आल्या होत्या. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांपैकी अँडी रॉबर्ट्सने तीन बळी घेतले, तर माल्कम मार्शल, मायकल होल्डिंग आणि लॅरी गोम्स यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. १८३ धावांचा बचाव करताना भारताने वेस्ट इंडिजच्या धावांची गती रोखण्यात यश मिळवले आणि त्यांची अवस्था ५७/३ अशी केली. त्यानंतर लवकरच कॅरिबियन संघाची स्थिती ७६/६ अशी झाली आणि भारत विजयाच्या दिशेने वाटचाल करू लागला.
मोहिंदर अमरनाथने मायकल होल्डिंगचा बळी घेत भारताला पहिले विश्वचषक विजेतेपद मिळवून दिले. अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ १४० धावांत सर्वबाद झाला आणि भारताने ४३ धावांनी सामना जिंकला. लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर कपिल देव यांनी विश्वचषकाची ट्रॉफी उंचावलेला क्षण आजही सर्व भारतीय चाहत्यांच्या स्मरणात आणि मनाला सुखावणारा आहे. अंतिम सामन्यात मोहिंदर अमरनाथ यांची 'सामनावीर' म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांनी फलंदाजी करताना २६ धावा केल्या आणि गोलंदाजी करताना तीन बळीही घेतले होते.
वेस्ट इंडिजने पहिली दोन विश्वचषक विजेतेपदे (१९७५, १९७९) जिंकली आणि १९८३ मध्ये ते उपविजेते ठरले. दुसरीकडे, भारताने १९८३ आणि २०११ मध्ये असे दोनदा विजेतेपद पटकावले आहे. २८ वर्षांनंतर दुसरे विजेतेपद जिंकणाऱ्या २०११ च्या संघाचे नेतृत्व एम.एस. धोनीने केले होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत २०२३ च्या विश्वचषकात उपविजेता ठरला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे