आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत २४ पदकांसह भारत अव्वल
नवी दिल्ली, 26 जून (हिं.स.)। भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेने (एनआरएआय) आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय नेमबाजांनी केलेल्या शानदार कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. जर्मनीतील सुहल येथे आयोजित या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भा
Sports Shooting ISSF Junior World Championship Ind


नवी दिल्ली, 26 जून (हिं.स.)। भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेने (एनआरएआय) आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय नेमबाजांनी केलेल्या शानदार कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. जर्मनीतील सुहल येथे आयोजित या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताने ७ सुवर्ण, ८ रौप्य आणि ९ कांस्य अशी एकूण २४ पदके जिंकत पदकतालिकेत पहिले स्थान पटकावले. सलग दुसऱ्यांदा भारताने या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थान मिळवले आहे.

भारताच्या मोहिमेची सुरुवात सेजल कांबळे हिने १० मीटर एअर पिस्तूल ज्युनियर महिला गटात सुवर्णपदक जिंकून केली. याच स्पर्धेत हिमांशी हिने कांस्यपदक पटकावले. त्यानंतर सेजल कांबळे, वंशिका चौधरी आणि नव्या बिश्नोई यांच्या संघाने सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकून भारताची आघाडी अधिक मजबूत केली.

२५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल ज्युनियर पुरुष गटात समीर याने सुवर्णपदक जिंकले, तर रोहित कन्यन याने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन ज्युनियर पुरुष गटात सुवर्णपदक पटकावले. महिला गटातील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत प्राची गायकवाड हिने रौप्यपदक मिळवले. याशिवाय भारताने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन ज्युनियर पुरुष सांघिक प्रकारात आणि २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल ज्युनियर पुरुष सांघिक प्रकारात कांस्यपदके जिंकली.

१० मीटर एअर रायफल ज्युनियर महिला गटात अन्वी राठोड हिने कांस्यपदक जिंकले, तर प्रीतम केंद्रे याने ज्युनियर पुरुष गटात सुवर्णपदक पटकावले. भारताने २५ मीटर पिस्तूल ज्युनियर महिला सांघिक आणि ज्युनियर पुरुष सांघिक प्रकारातही कांस्यपदके जिंकली. १० मीटर एअर पिस्तूल ज्युनियर पुरुष गटात शिवा नरवाल याने रौप्य, तर युग प्रताप सिंह राठौर याने कांस्यपदक मिळवले. शिवा नरवाल याने संदीप बिश्नोई आणि चिराग शर्मा यांच्यासह सांघिक प्रकारातही रौप्यपदक जिंकले. त्यानंतर शिवा नरवाल आणि वंशिका चौधरी या जोडीने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारातही रौप्यपदक भारताच्या खात्यात जमा केले.

स्पर्धेच्या अंतिम टप्प्यातही भारताने आपली दमदार कामगिरी कायम राखली. अभिनव देशवाल याने २५ मीटर स्टँडर्ड पिस्तूल ज्युनियर पुरुष गटात सुवर्णपदक जिंकले, तर शांभवी श्रवण क्षीरसागर आणि अभिनव शॉ या जोडीने १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. २५ मीटर स्टँडर्ड पिस्तूल ज्युनियर पुरुष सांघिक संघाने रौप्यपदक जिंकले.

महिला गटातील २५ मीटर स्टँडर्ड पिस्तूल स्पर्धेत शौर्या दिलीप भारणे हिने रौप्य, तर रिया दुग्गल हिने कांस्यपदक मिळवले.

स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी राज चंद्रा याने ५० मीटर पिस्तूल ज्युनियर पुरुष गटात कांस्यपदक जिंकले, तर योगेश कुमार, प्रतीक आणि अभिनव चौधरी यांच्या संघाने रौप्यपदक पटकावले. महिला गटातील ५० मीटर पिस्तूल स्पर्धेत ऐश्वर्या रविचंद्र बालेहोसूर हिने रौप्यपदक जिंकत भारताची एकूण पदकसंख्या २४ वर पोहोचवली आणि संघाला पदकतालिकेत अव्वल स्थान मिळवून दिले.

एनआरएआयचे अध्यक्ष कालिकेश नारायण सिंह देव म्हणाले की, सलग दुसऱ्यांदा विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या पदकतालिकेत अव्वल राहणे ही भारतीय नेमबाजीसाठी ऐतिहासिक कामगिरी आहे. ही केवळ काही खेळाडूंची नव्हे, तर देशात घडत असलेल्या सक्षम प्रतिभा आणि तळागाळात सुरू असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ असल्याचे त्यांनी सांगितले.

एनआरएआयचे महासचिव पवन कुमार सिंह म्हणाले की, सुहलसारख्या कठीण परिस्थितीत युवा नेमबाजांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी भारतीय नेमबाजीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशादायी आहे. आता या खेळाडूंना वरिष्ठ स्तरावरही अशीच यशस्वी कामगिरी करता यावी, हेच आमचे पुढील लक्ष्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande