आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची कसोटी
बेलफास्ट, 25 जून (हिं.स.) । भारतीय संघ बेलफास्टमध्ये आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. ही मालिका श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात ठरेल. मात्र, कर्णधारपदापेक्षाही, १५ वर्षीय वैभव सू
श्रेयस अय्यर


बेलफास्ट, 25 जून (हिं.स.) । भारतीय संघ बेलफास्टमध्ये आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. ही मालिका श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात ठरेल. मात्र, कर्णधारपदापेक्षाही, १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळेल की नाही, हा चर्चेचा मुख्य विषय आहे.

मालिकेपूर्वी, वैभव सूर्यवंशी हे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. या १५ वर्षीय भारतीय फलंदाजाने गेल्या काही महिन्यांतील आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे, ज्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. आता सर्वांचे लक्ष वैभवच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणावर लागले आहे. जर त्याने पहिल्या टी-20 सामन्यात बेलफास्टमध्ये पदार्पण केले, तर तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडित काढणार आहे. आणि आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू बनणार आहे.

वैभव आणि अभिषेक शर्मा डावाची सुरुवात करू शकतात. दोघेही आक्रमक फलंदाज असून भारताला वेगवान सुरुवात करून देऊ शकतात. संजू सॅमसनला तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते. कर्णधार श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. फॉर्मात असलेल्या तिलक वर्माला त्याच्यानंतर पाठवले जाऊ शकते. भारतीय अ संघाने श्रीलंकेत नुकतीच तिलकच्या नेतृत्वाखाली तिरंगी मालिका जिंकली आहे.

श्रेयस अय्यर गेल्या तीन हंगामांपासून आयपीएलमध्ये एक यशस्वी कर्णधार राहिला आहे. कर्णधार म्हणून त्याने ५७ पैकी ४१ सामने जिंकले आहेत. त्याने २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला विजेतेपद मिळवून दिले आणि २०२५ मध्ये पंजाब किंग्सला उपविजेतेपदापर्यंत पोहोचवले होते. पण डिसेंबर २०२३ नंतर अय्यर पहिल्यांदाच टी२० संघात परतला आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाची कसोटी या मालिकेत लागणार आहे.

वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे टी२० विश्वचषक आणि आयपीएल २०२६ च्या हंगमाला मुकावे लागले होते. लिगामेंटच्या दुखापतीतून सावरल्यानंतर, अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले. पण त्याला अंतिम ११ क्रिकेटपटूंमध्ये स्थान मिळाले नाही. संघ व्यवस्थापनाने त्याच्या जागी प्रिन्स यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर विश्वास ठेवला होता.

प्रिन्स यादवने आयपीएल २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याने १४ सामन्यांमध्ये १६ बळी घेतले होते. प्रसिद्ध कृष्णानेही आपल्या अलीकडील एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच बळी मिळवले. जवळपास सहा महिन्यांनंतर टी-२० संघात परतलेल्या हर्षित राणाला थेट संधी मिळते की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande