टीव्हीएस आयक्यूबचा नवा विक्रम; दहा लाखाव्या इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन पूर्ण
- टीव्हीएसच्या होसूर प्रकल्पातून ऐतिहासिक टप्पा गाठला - भारताच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रवासाला नवी गती बेंगळुरू, 25 जून (हिं.स.) : दुचाकी आणि तीन-चाकी वाहनांच्या निर्मितीतील आघाडीची कंपनी असलेल्या टीव्हीएस मोटर कंपनीने होसूर येथील उत्पादन प्रकल्
टीव्हीएस  संग्रहित फोटो


- टीव्हीएसच्या होसूर प्रकल्पातून ऐतिहासिक टप्पा गाठला - भारताच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रवासाला नवी गती

बेंगळुरू, 25 जून (हिं.स.) : दुचाकी आणि तीन-चाकी वाहनांच्या निर्मितीतील आघाडीची कंपनी असलेल्या टीव्हीएस मोटर कंपनीने होसूर येथील उत्पादन प्रकल्पातून दहा लाखाव्या टीव्हीएस-आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. भारताच्या इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) क्षेत्रातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात असून, शाश्वत आणि स्मार्ट वाहतूक व्यवस्थेकडे देशाची होत असलेली वाटचाल अधोरेखित करणारा हा क्षण आहे.

टीव्हीएस मोटर कंपनीने भारतातच डिझाइन, विकसित आणि उत्पादित केलेल्या टीव्हीएस-आयक्यूब या इलेक्ट्रिक स्कूटरने गेल्या काही वर्षांत ग्राहकांचा मोठा विश्वास संपादन केला आहे. 2020 मध्ये बाजारात दाखल झाल्यानंतर टीव्हीएस-आयक्यूब हा देशातील सर्वाधिक पसंतीचा कौटुंबिक इलेक्ट्रिक स्कूटर ब्रँड म्हणून उदयास आला आहे. या यशाबद्दल बोलताना टीव्हीएस मोटर कंपनीचे अध्यक्ष सुदर्शन वेणू म्हणाले की, “दहा लाख टीव्हीएस-आयक्यूब स्कूटर ग्राहकांपर्यंत पोहोचणे हे भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटीचा वाढता स्वीकार दर्शवते. अभियांत्रिकी, संशोधन, उत्पादन नवकल्पना आणि तांत्रिक क्षमतांमध्ये केलेल्या सातत्यपूर्ण गुंतवणुकीचे हे फलित आहे. विकसित भारताच्या ध्येयासाठी भारताला जागतिक मोबिलिटी क्षेत्रात नेतृत्व करण्याची मोठी संधी आहे आणि त्या दिशेने टीव्हीएस कटिबद्ध आहे.

कंपनीने विविध बॅटरी क्षमता, अधिक रेंज आणि आधुनिक कनेक्टेड फीचर्ससह टीव्हीएस-आयक्यूब श्रेणीचा विस्तार केला आहे. देशातील 3,000 हून अधिक शहरांमध्ये 3,300 पेक्षा जास्त विक्री व सेवा केंद्रांच्या जाळ्यामुळे इलेक्ट्रिक मोबिलिटीचा प्रसार करण्यास मदत झाली आहे.

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही टीव्हीएस-आयक्यूबने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कंपनीच्या माहितीनुसार, टीव्हीएस-आयक्यूब वापरणाऱ्या ग्राहकांनी एकत्रितपणे 14.94 अब्ज किलोमीटरपेक्षा अधिक अंतर प्रवास केले असून त्यामुळे सुमारे 5.23 लाख टन कार्बन उत्सर्जन टाळण्यात यश आले आहे. ही बचत जवळपास 2.09 कोटी झाडे लावण्याइतक्या पर्यावरणीय फायद्याच्या समतुल्य असल्याचे कंपनीने नमूद केले.

भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्र वेगाने विस्तारत असताना, टीव्हीएस-आयक्यूबचा हा 10 लाख उत्पादनांचा टप्पा देशाच्या हरित आणि शाश्वत भविष्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande