
फ्लोरिडा (अमेरिका), 25 जून (हिं.स.) मियामी स्टेडियमवर झालेल्या 'गट सी'मधील अखेरच्या सामन्यात स्कॉटलंडवर ३-० असा दणदणीत विजय मिळवून ब्राझीलने फिफा विश्वचषक २०२६ च्या बाद फेरीत आपले स्थान निश्चित केले. पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलच्या संघासाठी विनिअस ज्युनियरने चमकदार कामगिरी केली.
ब्राझीलने सामन्याची दमदार सुरुवात केली आणि सातव्या मिनिटाला आघाडी घेतली. विनिअसने स्कॉटलंडचा गोलरक्षक अँकस गनला चकवले आणि शांतपणे चेंडू जाळीत धाडला. या गोलसह विनिअसने ब्राझीलच्या फुटबॉल इतिहासात आपले नाव कोरले. तो गेल्या २४ वर्षांत पहिल्या तीन फिफा विश्वचषक सामन्यांमध्ये गोल करणारा पहिला ब्राझिलियन फुटबॉलपटू ठरला आहे. यापूर्वी २००२ मध्ये रोनाल्डो नाझारिओ आणि रिव्हाल्डो यांनी अशी कामगिरी केली होती. जयर्झिनो (१९७०), रोमारिओ (१९९४) तसेच रोनाल्डो आणि रिव्हाल्डो (२००२) यांच्यानंतर तीन फिफा विश्वचषक सामन्यांमध्ये गोल करणारा विनिअस ज्युनियर हा केवळ पाचवा ब्राझिलियन फुटबॉलपटू ठरला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या तिन्हीवेळेस ब्राझीलने ती स्पर्धा जिंकली होती.
दक्षिण अमेरिकन संघाने चेंडूवरील ताबा कायम राखला आणि आपली आघाडी दुप्पट करण्याच्या जवळ पोहोचले होते. पण 'व्हीएआर' तपासणीनंतर विनिअसचा दुसरा गोल रद्द करण्यात आला. ब्राझीलच्या शिस्तबद्ध बचावफळीसमोर स्कॉटलंडला स्पष्ट संधी निर्माण करण्यात संघर्ष करावा लागला आणि पहिल्या हाफच्या अतिरिक्त वेळेत ते आणखी पिछाडीवर पडले.
ब्राझीलने सामन्यावरील नियंत्रण कायम राखले आणि ६० व्या मिनिटाला विजयावर शिक्कामोर्तब केले. गिमाराएसने पुन्हा एकदा महत्त्वाची भूमिका बजावली; त्याने पेनल्टी एरियामध्ये धडक मारत मॅथियस कुन्हासाठी संधी निर्माण केली आणि कुन्हाने आत्मविश्वासाने गोल करत ब्राझीलची आघाडी ३-० अशी केली.
दुखापतीतून सावरल्यानंतर या स्पर्धेत पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या नेमारचे ब्राझीलच्या संघात पुनरागमन झाले. सामन्याच्या अंतिम टप्प्यात बदली फुटबॉलपटू म्हणून मैदानात आलेल्या नेमारच्या उपस्थितीत ब्राझीलने सहज विजय साकारला. या विजयामुळे ब्राझीलने सात गुणांसह 'गट सी'मध्ये अव्वल स्थान पटकावले आणि 'राउंड ऑफ ३२'मध्ये प्रवेस केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे