
अकोला, 27 जून (हिं.स.)।अकोला शहरातील नव्या बसस्थानक परिसरात शनिवारी एका महिलेशी कथित छेडछाडीची आणि गैरवर्तनाची गंभीर घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला शेगावला जाण्यासाठी बसस्थानकात आली होती. त्यावेळी एका तरुणाने तिच्याशी कथितपणे छेडछाड करण्यास सुरुवात केली.महिलेच्या आरोपानुसार, आरोपीने तिच्याशी अश्लील हावभाव केले, अश्लील भाषेचा वापर केला आणि गैरवर्तन केले. महिलेने विरोध केल्यानंतर आरोपीने तिला धक्का देऊन खाली पाडल्याचा आरोप असून, त्यामध्ये ती जखमी झाली. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला.महिलेच्या मदतीसाठी धावून आलेल्या एका व्यक्तीवरही आरोपीने हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.ही संपूर्ण घटना बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. यामुळे घटनेचे नेमके स्वरूप आणि आरोपीच्या हालचाली स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, वृत्त लिहिपर्यंत पोलिसांकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती.दिवसा भर सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका बाजूला महिला सुरक्षेबाबत मोठे दावे केले जात असताना, दुसऱ्या बाजूला बसस्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी अशा घटना घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.स्थानिक नागरिकांनी आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, बसस्थानक परिसरात पोलिस गस्त वाढवावी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.या प्रकरणात जिल्हा पोलिस प्रशासन किती तत्परतेने कारवाई करते आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कोणती ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे