
लातूर, 30 जून (हिं.स.) अहमदपूर शहरातील नागोबा नगर पाटीजवळील मनीषा एजन्सीसमोर भरधाव क्रेनने दुचाकीस्वाराला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सौरभ मंचकराव लामतुरे (वय २६, रा. खंडाळी, ता. अहमदपूर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २६ जून रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात 29 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज मिळालेल्या माहितीनुसार, मृत सौरभ लामतुरे हा २६ जून रोजी आपला मित्र विनोद दुष्यंत कांबळे याच्यासोबत दुचाकीने (क्र. MH 22 AQ 6194) टायर बदलण्यासाठी अहमदपूर येथे आला होता. नागोबा नगर परिसरातील मनीषा एजन्सीच्या समोरील रोडवर दुचाकी थांबवून विनोद कांबळे दुचाकी पार्किंगसाठी जात असताना, लातूरकडून अहमदपूरच्या दिशेने येणाऱ्या क्रेनच्या (क्र. MH 24 BR 5948) चालकाने भरधाव वेगाने येऊन सौरभला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात सौरभ गंभीर जखमी झाला. अपघातानंतर क्रेन चालक क्रेनसह घटनास्थळावरून फरार झाला. जखमी सौरभला तातडीने अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी मयत सौरभची आई शोभा मंचकराव लामतुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून, अहमदपूर पोलीस ठाण्यात क्रेन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम २८१, १०६(१) आणि महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या कलम १३४ व १७७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक स्मिता जाधव करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis