
रायगड, 27 जून (हिं.स.)। : पोलादपूर पोलीसांनी बेकायदेशीर गोवंश वाहतुकीवर कारवाई करत बोलेरो पिकअपमधून एका गायीची वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलादपूर पोलीस हद्दीतील मौजे कोंढवी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोंढवी फाटा येथे पहाटे सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी बोलेरो पिकअप (क्र. एमएच-06-बीडब्ल्यू-9687) तपासणीसाठी थांबविली असता त्यामध्ये एका गायीची वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आले.तपासादरम्यान संबंधितांकडे जनावरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवाना नसल्याचे उघड झाले. तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जनावराची तपासणी करण्यात आलेली नव्हती. वाहनामध्ये प्रथमोपचाराचे साहित्य उपलब्ध नव्हते तसेच जनावरासाठी चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले.या प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात गुरनं. ७०/२०२६ अन्वये संबंधित दोघांविरुद्ध पशू वाहतूक अधिनियम, १९७८ मधील कलम ४७(अ), ४७(ब), ४८ तसेच मोटार वाहन कायदा कलम ६६/१९२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)