कोकरूडमध्ये स्मार्ट मीटरची तोडफोड; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
महावितरणचा इशारा : शासनाच्या मालमत्तेचे नुकसान खपवून घेतले जाणार नाही कोल्हापूर, २७ जून (हिं.स.) : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोकरूड येथे स्मार्ट मीटरची जाणीवपूर्वक तोडफोड केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध कोकरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण
कोकरूडमध्ये स्मार्ट मीटरची तोडफोड; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


महावितरणचा इशारा : शासनाच्या मालमत्तेचे नुकसान खपवून घेतले जाणार नाही

कोल्हापूर, २७ जून (हिं.स.) : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोकरूड येथे स्मार्ट मीटरची जाणीवपूर्वक तोडफोड केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध कोकरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाच्या मालमत्तेचे नुकसान कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नसल्याचा इशारा महावितरणने दिला आहे.

महावितरणकडून केंद्र शासनाच्या रिवॅम्प्ड डिस्ट्रीब्युशन सेक्टर स्कीम (RDSS) अंतर्गत राज्यभर स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असून, कोकरूड परिसरातही बहुतांश ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. या दरम्यान एका ग्राहकाच्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरची जाणीवपूर्वक तोडफोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे महावितरणच्या मालमत्तेचे सुमारे ५,२०० रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आली आहे.

या प्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता शिवदास देशमाने यांनी कोकरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अनिल मारुती घोडे-पाटील आणि महादेव बापू खवळे (रा. कोकरूड, ता. शिराळा) यांच्याविरुद्ध विद्युत अधिनियम, २००३, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

महावितरणने स्पष्ट केले की, राज्यात केंद्र शासनाच्या धोरणानुसार स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविली जात असून, वीज वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक, अचूक आणि कार्यक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. स्मार्ट मीटर हे महावितरणची मालमत्ता असल्याने त्यांची स्थापना किंवा बदली करण्यासाठी ग्राहकांच्या स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नसते.

दरम्यान, नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवा किंवा अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, तसेच स्मार्ट मीटरविषयी कोणतीही शंका अथवा तक्रार असल्यास संबंधित महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही महावितरणने केले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande