

रायगड, 28 जून (हिं.स.)। : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर गावाच्या हद्दीत रस्त्यात बंद पडलेला ट्रेलर योग्य इशारा किंवा टेल लाईट न लावता उभा ठेवल्याने झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत प्रवास करणारी व्यक्ती जखमी झाली. या प्रकरणी ट्रेलर चालकाविरुद्ध खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे २.१५ वाजता ट्रेलर (क्र. एमएच-४६/बीएम-४१९६) पनवेलहून रानसईच्या दिशेने जात असताना खालापूर गावाजवळ बंद पडला. मात्र चालकाने वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत उभे केले. तसेच मागील टेल लाईट किंवा इशारा न दिल्याने पेण तालुक्यातील सापोली येथील दुचाकीस्वाराची (क्र. एमएच-०६/बीएल-८३९३) ट्रेलरला जोरदार धडक बसली.
या अपघातात दुचाकी चालकाला डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. दुचाकीवरील मागील प्रवाशालाही किरकोळ ते गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या. अपघातानंतर ट्रेलर चालकाने कोणतीही मदत न करता किंवा पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७१/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१, २८५ तसेच मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम १३४ व १८७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कुथे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)