
नांदेड, 28 जून (हिं.स.)विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ७३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिस उपनिरीक्षक साईनाथ पुयड व पथकाने शंकरराव चव्हाण चौक बायपास परिसरात गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बोर्डाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील टायर वर्क्स दुकानाजवळ सापळा रचला. कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे दागिने व रोख रक्कम आढळून आल्याने चौकशी करण्यात आली.
चौकशीत आरोपींनी आणखी एका साथीदारासह काही दिवसांपूर्वी मेहबूबनगर आणि ओंकारेश्वरनगर परिसरातील बंद घरांचे कडी-कोंडे तोडून घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरीतील दागिने विकून पैसे वाटून घेण्याच्या तयारीत असतानाच पथकाने त्यांना जेरबंद केले. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला ७३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल आणि दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी विमानतळ पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis