
परभणी, 29 जून (हिं.स.)। परभणी शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेला टिप्पर फोडून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न उघडकीस आला असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून टिप्परचे तुकडे जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक टिप्पर चोरीस गेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली होती. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चोरीचा टिप्पर वाशीम येथे नेऊन त्याचे तुकडे करण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू करून महेफुज रहमान शेख रज्जाक यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले साथीदार शेख नवीद शेख मकाजीत, सय्यद हुजर्या यांच्या मदतीने टिप्पर चोरी करून त्याचे तुकडे केल्याची कबुली दिली. तसेच टिप्परचे सुटे भाग स्क्रॅपमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली.
यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून टिप्परचे तुकडे व सुटे पार्ट्स जप्त केले. आरोपीला पुढील कारवाईसाठी नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, या गुन्ह्यातील इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis