
रायगड, 29 जून (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिळफाटा परिसरात किरकोळ वादातून एका युवकावर धारदार कटरने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी (दि. २८ जून) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या प्रकरणातील आरोपीला अवघ्या काही तासांत अटक करण्यात आल्याची माहिती खोपोली पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा आपल्या वडिलांसह फळविक्रीचा व्यवसाय करून घरी परतत असताना, शिळफाटा येथील जामा मशिदीमागील परिसरात आरोपीने कोणतेही कारण नसताना फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. हा वाद सोडविण्यासाठी फिर्यादी मध्यस्थी करण्यासाठी गेल्यानंतर आरोपीने हातातील धारदार कटरने त्याच्या कपाळावर तसेच मानेच्या उजव्या बाजूला वार केले. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला त्याच रात्री सुमारे ११.३९ वाजता अटक केली.या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३४/२०२६ नोंद करण्यात आला असून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ११८(२), ११५(२), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एडवळे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)