
तेहरान, 03 जून (हिं.स.)।इराणचे माजी सर्वोच्च नेते आयातोल्ला अली खामेनेई यांच्या पार्थिवावर लवकरच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासाठी इराण सरकारने तीन दिवसांच्या राजकीय अंत्यसंस्कार कार्यक्रमाची घोषणा केली आहे. तेहरान, कुम आणि मशहद येथे होणाऱ्या या कार्यक्रमांना सुमारे दोन कोटी लोक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, तेहरान, कुम आणि मशहद या तीन शहरांमध्ये अंत्ययात्रा काढण्यात येणार असून, सर्व ठिकाणी मोठ्या सार्वजनिक सभा आणि श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यापैकी केवळ तेहरानमधील मुख्य कार्यक्रम २४ तासांहून अधिक काळ चालणार आहे.
अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, तेहरानमध्येच सुमारे दोन कोटी लोक जमू शकतात. एवढ्या मोठ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष तयारी केली जात आहे.
दरम्यान, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात तत्कालीन सर्वोच्च नेते आयातोल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. इस्लामी परंपरेनुसार मृतदेहाचे दफन तातडीने केले जाते. मात्र, इराणी अधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम दीर्घकाळ पुढे ढकलला होता. मार्चच्या सुरुवातीला प्रशासनाने सांगितले होते की, संभाव्य प्रचंड गर्दीमुळे तत्काळ अंत्यसंस्कार करणे शक्य नाही. आता सरकारी वृत्तसंस्थाने या कार्यक्रमाचे आयोजन जूनमध्ये होणार असल्याचे म्हटले आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात अंत्यसंस्कार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात आयातोल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. याच बॉम्बहल्ल्यात त्यांचे पुत्र मोजतबा खामेनेई हे गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर मोजतबा खामेनेई यांच्याबाबत विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात होते. दरम्यान, इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चा पूर्णपणे ठप्प झालेली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode