
जकार्ता, 03 जून (हिं.स.)भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी, सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, यांचा इंडोनेशिया ओपन २०२६ मधील प्रवास निराशाजनक रीतीने संपला. जकार्ता येथे खेळल्या जात असलेल्या सुपर १००० स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत दुखापतीमुळे या भारतीय जोडीला सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे.
मलेशियाच्या कांग खाई शिंग आणि ॲरॉन ताई यांच्याविरुद्ध खेळताना, भारतीय जोडी ६-११ ने मागे असताना सात्विकने त्याच्या उजव्या खांद्यात वेदना होत असल्याची तक्रार केली आणि सामना थांबवण्यात आला. या हंगामात जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जोडीला दुखापतीमुळे सामन्यातून माघार घ्यावी लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भारतीय बॅडमिंटन संघटनेने सात्विकच्या दुखापतीची पुष्टी केली आहे. संघटनेने म्हटले आहे की, सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सात्विकच्या दुखापतीमुळे पॉलीट्रॉन इंडोनेशिया ओपन २०२६ मधून माघार घेतली आहे. ही जोडी आता आगामी महत्त्वाच्या स्पर्धांच्या तयारीसाठी दुखापतीतून सावरण्यावर आणि पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करेल. आम्ही सात्विकच्या शीघ्र आरोग्यासाठी शुभेच्छा देतो आणि ते दोघेही लवकरच कोर्टवर परततील अशी आशा करतो.
सात्विक आणि चिराग यांनी उत्कृष्ट फॉर्ममध्ये इंडोनेशिया ओपनमध्ये प्रवेश केला होता. रविवारी सिंगापूर ओपन जिंकून त्यांनी जवळपास दोन वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. अंतिम सामन्यात, या भारतीय जोडीने फजर अल्फियान आणि मोहम्मद सोहिबुल फिक्री यांचा एक तास आणि १३ मिनिटे चाललेल्या अटीतटीच्या लढतीत पराभव केला. एका आठवड्यापूर्वी, ते थायलंड ओपनच्या अंतिम फेरीतही पोहोचले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे