
नवी दिल्ली, 03 जून (हिं.स.) - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी एक मोठे पाऊल उचलले आहे. बीसीसीआयने साईराज बहुतुले यांची भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना ६ जूनपासून मुल्लानपूर येथे खेळला जाईल. या सामन्यात भारत शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळेल.
बीसीसीआयने म्हटले आहे, बीसीसीआयला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, साईराज बहुतुले यांची भारतीय क्रिकेट संघाच्या (वरिष्ठ संघ) फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय संघासोबतचा त्यांचा पहिला दौरा ६ जूनपासून मुल्लानपूर येथे सुरू होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याने होईल. या कसोटी सामन्यादरम्यान ते मानव सुथार आणि हर्ष दुबे यांसारख्या नवीन क्रिकेटपटूंसोबत काम करतील.
बहुतुले हे भारताचे माजी क्रिकेटपटू आणि देशांतर्गत क्रिकेटमधील एक दिग्गज व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी भारताचे दोन कसोटी आणि आठ एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. त्यांची प्रथम-श्रेणी कारकीर्द जवळपास दोन दशकांची होती. त्याने प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये ६१७६ धावा केल्या असून ६३० बळी घेतले आहेत आणि तो भारताच्या सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटूंपैकी एक आहे.
आपल्या क्रिकेट कारकिर्दीनंतर, बहुतुले यांनी अनेक संघांना प्रशिक्षणही दिले आहे. त्यांनी विदर्भ, केरळ, गुजरात आणि बंगालचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय, बहुतुले यांनी आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. बहुतुले हे २०२२ मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते आणि २०२४ च्या विश्वचषकातही ते प्रशिक्षण चमूचा भाग होते. त्यांनी अनेक प्रसंगी भारत 'अ' आणि वरिष्ठ पुरुष संघांसाठी विशेषज्ञ गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. बहुतुले हे २०२१ ते २०२४ या काळात बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (सेंटर ऑफ एक्सलन्स) येथील प्रशिक्षण चमूचे एक प्रमुख सदस्य होते.
साईराज बहुतुले म्हणाले की, भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी माझी नियुक्ती होणे, हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. एक क्रिकेटपटू म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब होती, आणि आता प्रशिक्षणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमध्ये योगदान देण्याची संधी मिळणे, हे खूप विशेष आहे. मी क्रिकेटपटूंसोबत काम करण्यास आणि संघाला सर्व फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी पाठिंबा देण्यास उत्सुक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे