
लातूर, 30 जून (हिं.स.)। लातूर शहरातील विविध भागांतून चोरीला गेलेले व हरवलेले मोबाईल शोधून काढण्यात लातूर शहर पोलिसांना मोठे यश आले आहे. विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, लातूर येथे ३० जून रोजी आयोजित एका कार्यक्रमात पोलीस प्रशासनाच्या वतीने हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.
लातूर शहरातील चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गेल्या काही दिवसांत मोबाईल चोरीच्या आणि हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत लातूर शहर पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सायबर सेलच्या मदतीने या मोबाईलचा शोध घेतला. अथक परिश्रमानंतर पोलिसांनी हे मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले.
मालकांच्या चेहऱ्यावर हास्य: दुपारी विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात संबंधित तक्रारदारांना बोलावून त्यांचे मोबाईल प्रत्यक्ष खात्री करून परत करण्यात आले. आपला हरवलेला महागडा मोबाईल पुन्हा आपल्या हातात पाहून नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी अनेकांनी पोलिसांच्या या तत्परतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
पोलीस प्रशासनाचे आवाहन : यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मोबाईल हरवल्यास त्वरित नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर सेलकडे तक्रार नोंदवावी, जेणेकरून तांत्रिक माहितीच्या आधारे मोबाईल शोधणे सोपे होते, असे त्यांनी सांगितले. पोलीस प्रशासनाच्या या कामगिरीमुळे लातूरकर नागरिकांकडून पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis