सोलापूर : कोंबिंग ऑपरेशनमध्ये गावठी कट्ट्यासह संशयिताला अटक
सोलापूर, 30 जून (हिं.स.) : सोलापूर शहर पोलीस दलाने गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी राबविलेल्या विशेष कोंबिंग ऑपरेशनदरम्यान एमआयडीसी पोलिसांनी एका संशयित इसमाला गावठी कट्ट्यासह अटक केली. आरोपीच्या ताब्यातून देशी बनावटीचे अग्निशस्त्र जप्त करण्य
Cp


सोलापूर, 30 जून (हिं.स.) : सोलापूर शहर पोलीस दलाने गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी राबविलेल्या विशेष कोंबिंग ऑपरेशनदरम्यान एमआयडीसी पोलिसांनी एका संशयित इसमाला गावठी कट्ट्यासह अटक केली. आरोपीच्या ताब्यातून देशी बनावटीचे अग्निशस्त्र जप्त करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरात विशेष कोंबिंग ऑपरेशन सुरू असताना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) पथकाला एका गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. सोलापूर-अक्कलकोट रोडवरील बीएसएनएल टॉवरजवळील सर्व्हिस रोडवर एक तरुण कंबरेला गावठी कट्टा लावून उभा असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

माहिती मिळताच एमआयडीसी गुन्हे प्रकटीकरण पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या संशयिताने पोलिसांचे वाहन पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

त्यानंतर करण्यात आलेल्या अंगझडतीत आरोपीच्या कंबरेला देशी बनावटीचा एक गावठी कट्टा आढळून आला. पोलिसांनी अग्निशस्त्र जप्त करून संशयिताला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच हे शस्त्र त्याच्याकडे कसे आले आणि त्यामागील उद्देश काय होता, याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

-------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande