
जैन मंदिरातून सोन्या-चांदीचा ऐवज लंपास; १६ मोबाइलसह रोकड पळविली
लासलगाव, 30 जून, (हिं.स.)। शहरात एकाच रात्री मंदिर, मोबाइल दुकानासह पंजाब नॅशनल बँकेत चोरी व चोरीच्या प्रयत्नाच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दिगंबर जैन मंदिर आणि सह्याद्री चौकातील मोबाइल दुकानात अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी (दि.३०) पहाटे २ वाजेच्या सुमारास चांदी-सोन्याचा ऐवजासह मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली आहे. तर पंजाब नॅशनल बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. या सर्व घटनांमधील तीन संशयित परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.
चोरट्यांनी सर्व्हे क्रमांक ९३ मधील दिगंबर जैन मंदिराच्या बाजूची सिमेंटची खिडकी फोडून मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील चांदीचे सिंहासन, चांदीचे पंचमेरू, पद्मावती मातेची सोन्याची पोत, चांदीचे छत्र, दानपेटीतील रोकडसह मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास
केल्या. मंगळवारी सकाळी सुमारे ७वाजता राजू दगडे मंदिरात अभिषेकासाठी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. दुसरा एका घटनेत सह्याद्री चौकातील अभिषेक खुटे यांच्या मालकीच्या मोबाइल दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुरुस्तीसाठी आलेल्या ग्राहकांचे १६ मोबाइल, ७०० रुपयांची रोकड आणि इतर साहित्य चोरून नेण्यात आले
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV