
अमरावती, 05 जून (हिं.स.) :
विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात येत्या १८ जूनला मतदान होणार असून जिल्ह्यातील ४५३ मतदार त्यासाठी मतदान करणार आहेत. या निवडणुकीत गैरप्रकार होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत असून मतदान सात केंद्रांवरून करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. या निवडणुकीत पसंतीक्रमाने मतदान करण्यात येणार असून ते कशा पद्धतीने करायचे, याच्या सूचना मतदारांना देण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम व सहायक पोलिस आयुक्त रमेश धुमाळ उपस्थित होते. ते म्हणाले, निवडणुकीच्या रिंगणातून अपक्ष उमेदवार प्रशांत महल्ले यांनी माघार घेतली असल्याने या रिंगणात आता भाजपचे प्रवीण पोटे, काँग्रेसचे हर्षजित देशमुख व वंचितचे नीलेश विश्वकर्मा हे तीन उमेदवार आहेत. अमरावती जिल्ह्यातील ४५३ मतदार असून त्यामध्ये २२७ महिला व २२६ पुरुष मतदार आहेत. मतदानाकरिता उपविभाग स्तरावर एकूण सात मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. धारणी तहसील कार्यालय, अचलपूर उपविभागीय कार्यालय, मोर्शी तहसील कार्यालय, दर्यापूर तहसील कार्यालय, तिवसा-भातकुली (कॅम्प रोड उपविभागीय कार्यालय), अमरावती नवीन तहसील तालुका प्रशासकीय इमारत व चांदूररेल्वे तहसील कार्यालय येथे हे मतदान केंद्र आहेत.
४२ जणांची नियुक्ती निवडणुकीकरिता उपविभाग स्तरावर प्रत्येक मतदानकेंद्रासाठी सात अधिकारी व कर्मचारी, असे एकूण ४२ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मतदानकेंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मतपेट्या नियोजन भवनात १८ जूनला मतदान आटोपल्यानंतर मतपेट्या नियोजन भवन येथील सुरक्षाकक्षामध्ये ठेवण्यात येणार आहेत. २२ जूनला मतमोजणी करण्यात येणार असून त्याकरिता दोन टेबल निश्चित करण्यात आले आहेत. एक टेबल संकलनासाठी ठेवण्यात आलेला असल्याचेही जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी