
लातूर, 06 जून, (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांचे गणवेश, बूट, सॉक्स, वह्या व पुस्तके खरेदीसाठी पालकांवर विशिष्ट दुकानांचा आग्रह धरू नये, अशी मागणी वीर योद्धा संघटनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक, लातूर विभाग यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. लातूरची ओळख शिक्षणाची पंढरी म्हणून सर्वत्र आहे. प्राथमिक ते उच्च शिक्षण हे गुणवत्तापूर्ण मिळत असल्याने पालकांचा ओढा हा लातूरकडे असतो.
दरम्यान, लातूर शहरासह जिल्हयात मागील काही वर्षांपासून काही शिक्षण संस्था या आपल्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य खरेदीसाठी विशिष्ट दुकानातून घेण्याचा आग्रह केला जातो. शिवाय अनेक संस्थानी ठराविक दुकानातुनच साहित्य खरेदी करण्यासंदर्भात सक्तीही केल्याचे काही प्रकार समोर आले होते. दरम्यान, अशा प्रकारामुळे पालकांचे स्वतंत्र हे हिरावले जाते शिवाय अनेक पालक आर्थिक अडचणींना सामोरे जात असताना त्यांना त्यांच्या सोयीनुसार व परवडणाऱ्या दरात शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. विद्यार्थी व पालकांच्या हितासाठी शिक्षण विभागाने याबाबत तात्काळ आदेश काढून आवश्यक कार्यवाही करावी, अन्यथा वीर योद्धा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख रोहित रांजणकर, पांडुरंग क्षीरसागर, दीपक तांदळे, रितेश शितोळे, श्री धीरज पाटील, धीरज चंदे व कृष्णा पांढरे उपस्थित होते. विद्यार्थी व पालकांच्या न्याय्य हक्कांसाठी वीर योद्धा संघटना सदैव कटिबद्ध आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis