
मान्सूनपूर्व कामांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
अमरावती, 05 जून (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यातील ४८२ गावांना संभाव्य पुराचा धोका असून, त्यापैकी सुमारे ३०० गावे अतिसंवेदनशील मानली जातात. पावसाळ्यात पूरपरिस्थिती उद्भवल्यास होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष सतर्कता बाळगली जाते आणि आपत्ती व्यवस्थापन पथके १६८ हून सक्रिय केली आहे. तसेच संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी दिली.
जिल्ह्यात १४ तालुक्यांतील ४८२ गावांना संभाव्य पुराचा धोका आहे. आगामी ७ जूनपासून मान्सून सक्रिय होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी, तसेच नागरिकांच्या बचावासाठी दरवर्षी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाद्वारे उपाययोजना केल्या जातात, अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पुर येऊन गावांना, नागरिकांना होणारा धोका टाळण्यासाठी, तसेच यापासून त्यांचा बचाव करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाने पूर्व नियोजन केले आहे. सन २००७ च्या सर्वेनुसार जिल्ह्यात ४८२ गावांना संभाव्य पुराचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे या गावांकडे आपत्ती विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. यातील २११ गावांना मोठ्या नद्यांमुळे धोका आहे, तर ३०२ गावे लहान नाले नद्यांमुळे २७१ गावे प्रभावित होतात. तसेच अशी परिस्थिती उद्भवल्यास त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून ६८६ तात्पुरत्या निवाऱ्यांची व्यवस्था केली आहे. या गावांमधील संभाव्य लोकसंख्या ५ लाख असून त्यापैकी १९२८ पोहणाऱ्यांची संख्या आहे.
प्रशासनाला सूचनानदी काठावर येणाऱ्या गावांना पुराच्या पाण्याच्या धोकादायक ठिकाणी सिमांकन करणे. पूर रेषा नदी नाल्याचे पात्रातील अनधिकृत, रहिवासी यांना नोटीस देणे, धरणातील पाणी सोडताना नदीकाठावरील सर्व गावांना, संबधित तहसिलदार, पोलीस स्टेशन अधिकारी, तालुका, जिल्हा नियंत्रण कक्ष यांना किमान २४ तास अगोदर कळविणे, मोठे मध्यम प्रकल्प तसेच जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पाची तातडीची दुरूस्ती करावी, प्रकल्पांच्या दरवाजांची दुरूस्ती करावी. नैसर्गिक पाणी साठे, प्रकल्पाचे कालवे व सांडवे दुरूस्ती, प्रकल्पावरील बिनतारी यंत्रणेची सज्जता ठेवावी. यासारख्या सूचना देण्यात आल्या आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी