लातूर जिल्हा कारागृहात वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती कार्यक्रम संपन्न
लातूर, 05 जून (हिं.स.)। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर, जिल्हा कारागृह, लातूर आणि आपले आरोग्य आपलीच जबाबदारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कारागृह, लातूर येथे वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार
जागतिक पर्यावरण दिन


लातूर, 05 जून (हिं.स.)। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर, जिल्हा कारागृह, लातूर आणि आपले आरोग्य आपलीच जबाबदारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कारागृह, लातूर येथे वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर संजय भारुका यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती करणे हा होता.

कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्यंकटेश गिरवलकर, जिल्हा कारागृहाचे अधीक्षक बी. एन. मुलाणी, तुरुंगाधिकारी श्रेणी-२ बी. एम. लटपटे तसेच आपले आरोग्य आपलीच जबाबदारी संस्थेचे संस्थापक संजय राजुळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी संजय राजुळे यांनी कैद्यांना मार्गदर्शन करताना निरोगी जीवनशैली, नियमित व्यायामाचे महत्त्व, व्यसनमुक्त जीवन आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर सविस्तर माहिती दिली. प्रत्येकाने दररोज किमान एक तास व्यायामासाठी द्यावा, व्यसनांपासून दूर राहावे तसेच किमान दोन झाडे लावून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी केले. पर्यावरणाचे महत्त्व, वृक्षसंवर्धनाची गरज आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी याविषयी कैद्यांशी संवाद साधत त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने सक्रिय भूमिका बजावण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

कार्यक्रमात कारागृहातील अधिकारी, कर्मचारी आणि कैदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी लावलेल्या वृक्षांचे जतन व संवर्धन करण्याची प्रतिज्ञा घेतली. एक झाड लावा – पर्यावरण वाचवा, हरित लातूर घडवा हा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande