एचपीव्ही आणि बीसीजी लसीकरणाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करा- छ. संभाजीनगर जिल्हाधिकारी
छत्रपती संभाजीनगर, 05 जून (हिं.स.)। जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थी बालकाला आवश्यक असलेल्या सर्व लसींचे लसीकरण पालकांनी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एचपीव्ही, पोलिओ, गोवर-रुबेला आणि बीसीजी या लसीकरणाचे सर्व डोस मुलांना वेळेत देण्याचे उद्दिष्ट
अ


छत्रपती संभाजीनगर, 05 जून (हिं.स.)।

जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थी बालकाला आवश्यक असलेल्या सर्व लसींचे लसीकरण पालकांनी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एचपीव्ही, पोलिओ, गोवर-रुबेला आणि बीसीजी या लसीकरणाचे सर्व डोस मुलांना वेळेत देण्याचे उद्दिष्ट जिल्हा आरोग्य विभागाने शंभर टक्के पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय लसीकरण टास्क फोर्स समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मंगल पांचाळ, समाज कल्याण अधिकारी बी. जी. अरवत, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर, महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला भांबरे, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्यासह सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, रोटरी क्लब आणि लायन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते.

शाळांमध्ये पालक सभांच्या माध्यमातून जनजागृती करा

बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून प्रतिबंध करणाऱ्या एचपीव्ही (HPV) लसीकरणामध्ये जिल्ह्याचे प्रमाण सध्या कमी आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून एकत्रित काम करणे गरजेचे आहे. मुलींच्या पालकांमध्ये या लसीबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आरोग्य आणि शिक्षण विभागाने शाळांमध्ये विशेष पालक सभांचे आयोजन करावे.

वैजापूर, संभाजीनगर, सोयगाव आणि सिल्लोड या तालुक्यांमध्ये बीसीजी आणि पोलिओ लसीकरणाचे प्रमाण अत्यल्प आहे. या भागात विशेष मोहीम राबवून एचपीव्ही, बीसीजी आणि गोवर-रुबेला लसीकरणाचे उद्दिष्ट त्वरित पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande