
रायगड, 05 जून (हिं.स.) : अलिबाग : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रायगड जिल्हा परिषदेत विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले. यानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ५) कुंटेबाग परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंगेश वाकडीकर यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याची योग्य निगा राखावी, असे आवाहन केले.
दरवर्षी ५ जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यंदा निसर्ग संवर्धन, प्रदूषणमुक्त पर्यावरण आणि हरित विकासाचा संदेश देण्यात आला. वाढते प्रदूषण आणि बदलते हवामान यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने वृक्षलागवडीचे महत्त्व अधिक वाढले आहे, असे यावेळी नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमात नारळ, बांबू आणि सुपारीच्या रोपांची लागवड करण्यात आली. गेल्या वर्षी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुमारे अडीच लाख रोपांची लागवड करण्यात आली होती, तर यावर्षीही मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) विशाल तनपुरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, कृषी विकास अधिकारी पवनकुमार नजन तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमातून पर्यावरण संरक्षण आणि हरित रायगड घडविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)