
संत गाडगेबाबा बचाव पथकाची यशस्वी मोहीम
अकोला, ५ जून (हिं.स.) : बाळापूर तालुक्यातील कोळासा गावाजवळील भिकुंड नदीत बुडालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने अथक प्रयत्नांनंतर शोधून बाहेर काढला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोळासा येथील रहिवासी देवराम तोताराम घोंगे (वय ५५) हे नेहमीप्रमाणे ट्युबच्या साहाय्याने भिकुंड नदी पार करून नदीपलीकडील शेतात गुरे चारण्यासाठी जात होते. गुरुवारी (४ जून) सायंकाळी गुरे आणण्यासाठी ते नदी पार करण्यास निघाले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. विशेष म्हणजे गुरे मात्र घरी परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.
नातेवाईकांनी शोधमोहीम सुरू केली असता नदीच्या पलीकडील काठाजवळ ट्युब, कपडे, चप्पल आणि कुऱ्हाड तरंगताना आढळून आली. त्यामुळे देवराम घोंगे नदीत बुडाल्याचा संशय अधिक गडद झाला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी संतोष येवलीकर, तहसीलदार वैभव फरतारे आणि बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश झोडगे यांनी तातडीने पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाला पाचारण केले.
पथक प्रमुख जीवनरक्षक दिपक सदाफळे यांच्या नेतृत्वाखालील बचाव पथक रात्री १० वाजता रेस्क्यू बोट आणि अत्याधुनिक शोध साहित्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पाहणीत नदीपात्रात सुमारे २० ते २५ फूट खोल पाणी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले.
या मोहिमेत दिपक सदाफळे यांच्यासह प्रतिक बोरसे, मयूर सळेदार, ऋषिकेश राखोंडे, विवेक गाडगे, शाम घोंगे, दिनेश डाबेराव, प्रतिक गाडगे, ओम घोंगे, गौरव गाडगे, वैभव गाडगे, अविनाश कोगदे, आदित्य गाडगे, दिपक घोंगे, प्रतिक घोंगे, रोहित बोरसे, शुभम वानखडे आणि सतीश वानखडे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
अखेर अथक प्रयत्नांनंतर शुक्रवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास देवराम घोंगे यांचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. त्यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
-----------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे