
अकोला, 05 जून (हिं.स.)।आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अकोल्यातील ' माय वसुधा विकास ' संस्था यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. गेल्या वीस वर्षांपासून पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या संस्थेने यंदाही जनजागृतीपर उपक्रम राबवत नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण केली.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संस्थेच्या वतीने शहरात संदेश रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे वृक्षसंवर्धन, प्लास्टिकमुक्त जीवनशैली आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. यावेळी नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी संस्थेने विशेष पुढाकार घेत हजार स्टीलच्या ताटांची व्यवस्था केली आहे. भंडारे, धार्मिक कार्यक्रम आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये प्लास्टिकच्या पातरवाड्यांचा वापर टाळण्यासाठी ही स्टीलची ताटे नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिली जातात.संस्थेने आतापर्यंत तब्बल ४२ हजार कापडी पिशव्यांचे वितरण केले असून पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. तसेच वृक्ष लागवड आणि संगोपनाची इच्छा असलेल्या नागरिकांना विविध प्रकारच्या रोपांचेही वाटप करण्यात आले.गेल्या दोन दशकांपासून पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या या सकारात्मक अभियानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, पर्यावरण रक्षणासाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे