अकोला-दर्यापूर रस्ते अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू; ग्रामस्थांनी केला रास्ता रोको
अकोला, 05 जून (हिं.स.)। मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या पती-पत्नीचा पहाटे पाच वाजेच्या सुमारास अकोला-दर्यापूर मार्गावरील खरप जवळ झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून ''रास्ता रोको'' आंदोलन सुर
Photo


अकोला, 05 जून (हिं.स.)। मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या पती-पत्नीचा पहाटे पाच वाजेच्या सुमारास अकोला-दर्यापूर मार्गावरील खरप जवळ झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून 'रास्ता रोको' आंदोलन सुरू केल्याने सुमारे दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, खरप बुद्रुक येथील रहिवासी विजय पांडुरंग इंगळे व त्यांची पत्नी प्रतिभा विजय इंगळे हे दोघे दुचाकीवरून जात होते. दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की, दोघेही 5 ते 10 फूट अंतरावर पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले आणि त्यांनी आरोपी चालकाला तात्काळ अटक करण्याची मागणी करत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. सुमारे एक ते दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून गावकरी व मृताच्या नातेवाईकांशी चर्चा करून आरोपींना लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, अपघाताला जबाबदार असलेल्या आरोपींचा शोध घेऊन अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा स्पष्ट इशारा मृतांच्या नातेवाईकांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande