पर्यावरणाचा बळी देऊन विकास होऊ शकत नाही - अमित ठाकरे
मुंबई, 05 जून (हिं.स.)। मुंबई किंवा राज्याचा विकास हा पर्यावरणाचा बळी देऊन होऊ शकत नाही, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते अमित ठाकरे यांनी केली. तसेच नाशिकमधील वृक्षतोडीवर टीका करताना ही झाडे तोडण्यामागे कोणाच्या तरी फायद्यासाठी जागा उ
Amit Thackeray


मुंबई, 05 जून (हिं.स.)। मुंबई किंवा राज्याचा विकास हा पर्यावरणाचा बळी देऊन होऊ शकत नाही, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते अमित ठाकरे यांनी केली. तसेच नाशिकमधील वृक्षतोडीवर टीका करताना ही झाडे तोडण्यामागे कोणाच्या तरी फायद्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला. पर्यावरण संवर्धन आणि विकास यामध्ये समतोल राखणे ही सरकारची जबाबदारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पर्यावरणाच्या प्रश्नावरही भूमिका मांडली.

राजकारणाचा सध्या जो चिखल झाला आहे, त्याकडे आता जनतेने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे असे ते म्हणाले. राजकीय पक्षांकडून उमेदवार निवडताना गुणवत्ता, जनाधार आणि कार्यकर्त्यांची निष्ठा याऐवजी पैसा, वैयक्तिक संबंध आणि आर्थिक ताकद यांना प्राधान्य दिले जात असल्याची तीव्र टीका अमित ठाकरे यांनी केली. लोकप्रतिनिधी निवडताना जनतेची भूमिका महत्त्वाची असून राजकीय नेत्यांमध्ये निर्माण झालेला अति आत्मविश्वास जनतेने मोडून काढण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.

अमित ठाकरे यांनी सांगितले की, आज राजकीय नेत्यांना आपण दिलेला उमेदवार कोणत्याही परिस्थितीत निवडून येईल, असा विश्वास वाटू लागला आहे. ज्याच्याकडे पैसा आहे, गाड्या आहेत किंवा जो नेत्यांचा जवळचा मित्र आहे, त्यालाच उमेदवारी दिली जात असल्याचे चित्र दिसत आहे. हा आत्मविश्वास जनतेने खोडून काढला पाहिजे. लोकांच्या मतांमुळेच हे नेते सत्तेच्या खुर्च्यांवर बसले आहेत, याची जाणीव त्यांना करून देण्याची गरज आहे. जनतेने दिलेल्या मुभेमुळेच राजकारणात अशा प्रकारचे प्रकार वाढले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा संदर्भ देत त्यांनी गंभीर आरोप केला की, काही ठिकाणी पाच ते सहा कोटी रुपये खर्च करून उमेदवार निवडून आणले गेले. अशा प्रवृत्ती वाढत असताना सामान्य नागरिक कधी जागा होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्या दिवशी जनता जागी होईल, त्या दिवशी सरकारलाही लोकांचा धाक वाटू लागेल. आम्हीही जनतेच्या जागृतीची वाट पाहत आहोत, असे ते म्हणाले.

दरम्यान, कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाबाबत विचारले असता अमित ठाकरे यांनी पक्षाची अधिकृत भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे मांडतील, असे स्पष्ट केले. मात्र वैयक्तिक मत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, कॉक्रोच जनता पक्षाने आंदोलन केले तर मला त्याचा आनंदच होईल. संबंधित केंद्रीय मंत्र्याने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे माझे मत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांनी या आंदोलनाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शविल्याचे मानले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande