
रायगड, 05 जून (हिं.स.)। भाताण आणि भाताणपाडा परिसराच्या सर्वांगीण विकासात अमिटी विद्यापीठाने गेल्या दशकभरात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विद्यापीठाच्या स्थापनेनंतर या भागातील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली असून रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, शाळा इमारती, पेव्हर ब्लॉक आदी विकासकामांना गती मिळाली आहे. त्यामुळे परिसराचा चेहरामोहरा बदलून विकासाची नवी वाट खुली झाली आहे.
निसर्गरम्य वातावरणात उभारलेल्या अमिटी विद्यापीठामुळे केवळ शैक्षणिक क्षेत्रालाच चालना मिळाली नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळाली आहे. देश-विदेशातील विद्यार्थी येथे उच्च शिक्षणासाठी येत असल्याने परिसराला राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख प्राप्त झाली आहे. आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि दर्जेदार शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणाबाबत आकर्षण वाढले आहे.
विद्यापीठामुळे स्थानिक युवक-युवतींसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. सिक्युरिटी, हाऊसकिपिंग, कॅन्टीन, वाहतूक, गार्डनिंग आणि विविध सेवा विभागांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात आले असून सुमारे २५० ते ३०० युवक-युवती येथे कार्यरत आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वाहतुकीमुळे १०० हून अधिक रिक्षाचालकांना नियमित रोजगार उपलब्ध झाला आहे. मेस सेवा, घरभाडे, डबे पुरवठा आणि इतर पूरक व्यवसायांनाही यामुळे मोठी चालना मिळाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाने अमिटी विद्यापीठाच्या कॅम्पस विस्तारासाठी रितनंद बलवेद एज्युकेशन फाउंडेशनला १५ एकर जमीन मंजूर केली आहे. या विस्तारामुळे नवीन शैक्षणिक सुविधा उभारल्या जाणार असून रोजगाराच्या आणखी संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शिक्षण, रोजगार आणि स्थानिक विकास यांचा समतोल साधत अमिटी विद्यापीठ भाताण–भाताणपाडा परिसराच्या प्रगतीचे महत्त्वाचे केंद्र ठरले असून प्रस्तावित विस्तारामुळे या विकासगाथेला आणखी नवी उंची मिळणार असल्याचे चित्र आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)