
रत्नागिरी, 5 जून (हिं.स.) । पर्यावरण, जैवविविधता आणि निसर्गसंवर्धन या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशनच्या कार्याचा व्याप, अभ्यासाची खोली आणि संशोधनाची क्षमता अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने तीन मान्यवर तज्ज्ञांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे.
आसमंतच्या संचालकपदी डॉ. अमृता भावे यांची, डॉ. सोनाली शिंदे आणि डॉ. केतन चौधरी यांची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी संस्थेच्या संचालक मंडळात संस्थापक नंदकुमार पटवर्धन, नितीन करमरकर, पुरुषोत्तम पेंडसे आणि जगदीश खेर यांचा समावेश होता. डॉ. अमृता भावे यांच्या नियुक्तीमुळे संचालक मंडळाची संख्या आता पाच झाली आहे.
डॉ. अमृता भावे सागरी जीवशास्त्र, किनारी परिसंस्था, समुद्रीजैवविविधता आणि वर्गीकरणशास्त्र क्षेत्रातील अनुभवी संशोधक आहेत. बॉंबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) मधील संशोधनाचा त्यांचा अनुभव आणि सागर महोत्सवासारख्या उपक्रमांमधील सक्रिय सहभाग यामुळे सागर आणि त्याच्या जीवसृष्टीविषयीचे त्यांचे ज्ञान व्यापक आहे.
डॉ. सोनाली शिंदे पर्यावरणशास्त्र, जैवविविधता, सूक्ष्मजीवशास्त्र, संशोधन पद्धती आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत. संशोधन आणि संवर्धन यांना जोडण्याची त्यांची क्षमता, तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी केलेले कार्य, आसमंतच्या भावी उपक्रमांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
डॉ. केतन चौधरी हे मत्स्यशास्त्र आणि सागरी संशोधन क्षेत्रातील ज्येष्ठ आणि आदरणीय नाव आहे. सध्या ते मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनाचे प्राचार्य तसेच मरीन बायोलॉजी रिसर्च स्टेशनचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. अनेक वर्षांपासून ते आसमंतच्या विविध उपक्रमांशी आत्मीयतेने जोडलेले असून त्यांच्या अनुभवाचा लाभ संस्थेला सातत्याने मिळत आला आहे.
या नियुक्त्यांच्या माध्यमातून आसमंतची अभ्यास आणि संशोधन करण्याची क्षमता एका नव्या स्तरावर पोहोचली आहे. आजवर पर्यावरण आणि जैवविविधता संवर्धनासाठी कार्यरत असलेली संस्था आता स्थल जैवविविधता, सागरी जैवविविधता, सागर व त्याच्या परिसंस्था, किनारी पर्यावरण, मत्स्यसंपदा, सूक्ष्मजीव विविधता, परिसंस्था अभ्यास आणि पर्यावरणीय संशोधन या सर्व क्षेत्रांत अधिक सक्षमपणे कार्य करू शकेल.
शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून संशोधकांपर्यंत, निसर्गप्रेमींपासून स्थानिक समुदायांपर्यंत आणि जनजागृतीपासून प्रत्यक्ष संशोधनापर्यंत अशी सर्वसमावेशक वाटचाल करण्यासाठी आवश्यक असलेली तज्ज्ञांची साथ आता आसमंतला लाभली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी