रासायनिक खतांच्या 'लिंकिंग'वर बंदी, तरीही सक्ती झाल्यास कुठे तक्रार करायची ?
अमरावती, 05 जून (हिं.स.) खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सर्वच रासायनिक खतांची दरवाढ झालेली आहे. शिवाय सर्वाधिक मागणी असलेल्या युरिया खतासोबत जोडखत देण्याचा अनिष्ट पायंडा खत कंपन्यांद्वारे पाडण्यात आलेला आहे. शेवटी हे जोडखत शेतकऱ्यांच्याच माथी मारले
रासायनिक खतांच्या 'लिंकिंग'वर बंदी, तरीही सक्ती झाल्यास कुठे तक्रार करायची ?


अमरावती, 05 जून (हिं.स.)

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सर्वच रासायनिक खतांची दरवाढ झालेली आहे. शिवाय सर्वाधिक मागणी असलेल्या युरिया खतासोबत जोडखत देण्याचा अनिष्ट पायंडा खत कंपन्यांद्वारे पाडण्यात आलेला आहे. शेवटी हे जोडखत शेतकऱ्यांच्याच माथी मारले जाते. त्यामुळे अशा प्रकाराविरुद्ध कृषी निविष्ठा विक्रेते व शेतकऱ्यांनी तक्रार करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

याशिवाय मे महिन्यात झालेल्या खरीप हंगामपूर्व आढावा सभेत राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लिंकिंग या प्रकारात रोखठोक भूमिका घेतली. त्यांनी सर्व खत कंपन्यांच्या विक्री प्रतिनिधींना सभेत उभे करीत जाब विचारला, तसेच लिंकिंगचा प्रकार आढळल्यास थेट कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले आहेत.यापूर्वी कृषी निविष्ठा विक्रेत्यांची राज्यस्तर संघटना 'माफदा'ने यावेळी लिंकिंग विरोधात आक्रमक भूमिका घेत २७ एप्रिलपासून कृषी निविष्ठा केंद्र बेमुदत बंद ठेवली होती. त्यानंतर शासनाने यूपी शासनाच्या धर्तीवर कायदा करीत लिंकिंग बंद करण्याचे आश्वासन दिले आहे. कृषी केंद्रात शेतकऱ्यांना लिंकिंगची सक्ती झाल्यास ते जवळच्या कृषी कार्यालयाकडे तक्रार करू शकतात असे कृषी विभागाने सांगितले.

लिंकिंगची तक्रार कुठे अन् कशी करायची ?

जर एखाद्या शेतकऱ्याला खत विक्रेत्याने लिंकिंगची सक्ती केली असेल, तर त्याला संबंधित कृषी अधिकारी, तालुका/जिल्हा कृषी कार्यालय, एसएओ कार्यालय किंवा कृषी विभागाच्या टोल-फ्री क्रमांकावर लेखी तक्रार करता येते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande