
अमरावती, 05 जून (हिं.स.)
शहरातील नागरिकांची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच गुन्हेगारी व अवैध कृत्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने मोर्शी नगरपरिषदेकडून शहरात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात आला आहे. नगराध्यक्ष प्रतीक्षा रवींद्र गुल्हाने यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे मोर्शी शहर आता अत्याधुनिक सुरक्षायंत्रणेने सज्ज झाले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ, जयस्तंभ चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच विविध संवेदनशील आणि वर्दळीच्या ठिकाणी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील हालचालींवर चोवीस तास लक्ष ठेवणे शक्य होणार असून संशयास्पद व्यक्ती, अवैध वाहतूक, चोरी, भांडणे, अपघात आणि इतर अनुचित घटनांवर नियंत्रण ठेवण्यास मोठी मदत मिळणार आहे. वाढत्या शहरीकरणासोबतच नागरिकांच्या सुरक्षेचे आव्हानही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष प्रतीक्षा गुल्हाने यांनी पुढाकार घेत शहरासाठी आधुनिक सुरक्षाव्यवस्थेची गरज ओळखून हा उपक्रम प्रत्यक्षात आणला. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून महिलांमध्ये, ज्येष्ठ नागरिकांमध्ये तसेच व्यापारी वर्गामध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे. सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून शहरातील गुन्हे उघडकीस आणणे, वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित माहिती उपलब्ध होणे शक्य होणार आहे. तसेच पोलिस प्रशासनालाही तपासकार्यात मोठी मदत मिळणार असल्याचे नागरिकांचे मत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त करीत नगराध्यक्ष प्रतीक्षा गुल्हाने यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अशाच लोकहिताच्या योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. सुरक्षित मोर्शी, स्मार्ट मोर्शी, या संकल्पनेला बळ देणारा हा सीसीटीव्ही प्रकल्प शहरासाठी एक महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीचा निर्णय ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी