चंद्रपुरात साडेतीन वर्षात ३२५ बळी, तर ३१0७३ रुग्ण...श्वसनविकार रुग्णांची संख्या मोठी
चंद्रपूर, 05 जून (हिं.स.)। सर्वाधिक प्रदूषित म्हणून गणल्या जाणाऱ्या चंद्रपुरात एकूण रुग्णसंख्येपैकी श्वसनविकार रुग्णांची संख्या मोठी असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दरम्यान चंद्रपुरात अशाच आजारांनी गेल्या साडेतीन वर्षात ३२५ जणांना मृत्यूच्या दा
चंद्रपुरात साडेतीन वर्षात ३२५ बळी, तर ३१0७३ रुग्ण...श्वसनविकार रुग्णांची संख्या मोठी


चंद्रपूर, 05 जून (हिं.स.)।

सर्वाधिक प्रदूषित म्हणून गणल्या जाणाऱ्या चंद्रपुरात एकूण रुग्णसंख्येपैकी श्वसनविकार रुग्णांची संख्या मोठी असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दरम्यान चंद्रपुरात अशाच आजारांनी गेल्या साडेतीन वर्षात ३२५ जणांना मृत्यूच्या दाढेत ढकलल्याचे वास्तवही समोर आले आहे.

राज्यात नागरिकीकरण होत आहे. शहरांमधील लोकसंख्या वाढत आहे. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. शहरांचा श्वास कोंडतो आहे. पाणी, ध्वनी आणि हवा प्रदुषण यासारख्या प्रश्नांवर आपल्याला मात करावयाची आहे. त्यासाठी आपले शहर स्वच्छ-सुंदर आणि हरित असणे अगत्याचे आहे. शहराचे सौंदर्य वाढवून शहरे पर्यावरणस्नेही करायची असतील तर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होणे, वृक्ष जगवले जाणे गरजेचे असल्याचे प्रतिपादित केले जात असताना सर्वाधिक प्रदूषित म्हणून गणल्या जाणाऱ्या चंद्रपुरात एकूण रुग्णसंख्येपैकी श्वसन विकार रुग्णांची संख्या मोठी असल्याचे समोर आले आहे.

प्रदुषणामुळे चंद्रपूरमध्ये आरोग्यविषयक अनेक समस्या आहेत. देशातील मोठ्या प्रदुषीत भागामध्ये या क्षेत्राचा समावेश होतो. विविध माध्यमातून होणाऱ्या येथील प्रदुषणावर जलद गतीने नियंत्रण आणणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात याव्या. शहरांमध्ये असलेल्या कोल डेपोंचे बाहेर स्थलांतर करण्यात यावे. राष्ट्रीय हरित लवादाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन व्हावे असे जाणकारांचे म्हणणे आहे.

पण मागील काही वर्षात येथे फुफ्फुसाच्या कर्करोगासारख्या आजारांमध्ये देखील वाढ झाली आहे. चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शहरात एकूण रुग्णांच्या संख्येपैकी दमा,अॅक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन, ब्राँकायटिस, फुफ्फुसाचा कर्करोग व इतर श्वसनाचे विकार रुग्णांची संख्याही मोठी आढळून येत आहे.

२०२३ पासून मे २०२६ पर्यंतचा आलेख बघता मागील ३ वर्षे ५ महिन्यात या विविध विकारांमुळे ३१ हजार ७३ रुग्ण आढळले. त्यातील एकूण ३२५ जणांचा मृत्यू हा श्वसनाशी संबंधित आणि अशाच प्रकारच्या विकारांनी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात सर्वाधिक १०६ मृत्यू हे २०२४ मध्ये झाले आहेत हे विशेष. २०२३ मध्ये चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात ८ हजार ३५६ रुग्ण ,२०२४ मध्ये ९ हजार ४५७, २०२५ मध्ये ९ हजार ४८१ तर २०२६ मध्ये मे पर्यंत ३ हजार ७७९ भरती झाले होते. यात तीव्र श्वसन संक्रमणाची संख्या खूप मोठी आहे.

दरम्यान मोठ्या उद्योगांसह रस्त्यावरील धूळ, कचरा ज्वलन, बांधकाम इत्यादी अनेक कारणांमुळे अलीकडे सर्वत्र प्रदूषणात मोठी वाढ झाली असून त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या असल्याचे ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

तीन वर्षे ५ महिन्यातील प्रदूषणाचे बळी...

वर्षे----------------बळी

२०२३ ...................९०

२०२४....................१०६

२०२५....................९५

२०२६ ( ३१ मे २०२६ पर्यंत ).............३४

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande