
परभणी, 05 जून (हिं.स.)। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आज स्वतः सायकलवरून कार्यालयात येत पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला. त्यांच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि इंधन बचतीचा प्रभावी संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचला.
वाढते प्रदूषण, इंधनाचा वाढता वापर आणि बदलते हवामान या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शक्य तिथे सायकलचा वापर केल्यास इंधन बचतीसोबतच आरोग्य संवर्धनालाही मोठा फायदा होतो, असेही त्यांनी नमूद केले.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती, स्वच्छता आणि नैसर्गिक संसाधनांच्या जतनासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis