
परभणी, 05 जून (हिं.स.)। भारतीय जनता पार्टी महानगर व ग्रामीणच्या वतीने मोदी सरकारची १२ वर्षे : विश्वास, विकास आणि जनकल्याण या विशेष अभियानांतर्गत जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन गुरुवारी शहरातील सिटी पॅलेस येथे करण्यात आले. आगामी विविध जनजागृती आणि जनसंपर्क कार्यक्रमांच्या नियोजनासाठी ही बैठक पार पडली.
बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड , मराठवाडा संयोजक नितीन काळे आणि युवा नेते राहुल लोणीकर उपस्थित होते. यावेळी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, गटनेते मुकिंद खिल्लारे, माजी जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, नगरसेवक डॉ. केदार खटिंग यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. कराड, नितीन काळे आणि राहुल लोणीकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विविध विकासकामे, जनकल्याणकारी योजना आणि संघटनात्मक उपक्रमांची माहिती दिली. तसेच ५ जूनचा जागतिक पर्यावरण दिन, २१ जूनचा आंतरराष्ट्रीय योग दिन आणि २५ जून रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या आपत्काल के ५१ साल कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीत विकसित भारत संकल्प संमेलन, विशेष जनसंपर्क अभियान, प्रगती पथ यात्रा, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, पत्रकार परिषद तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे वक्त्यांनी सांगितले. जिल्हास्तरीय बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. भागवत कराड यांनी मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विकासकामे, जनहिताच्या योजना आणि आगामी अभियानांबाबत पत्रकारांना माहिती दिली.
बैठकीस भाजपा महानगर व ग्रामीणचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis