
रायगड, 05 जून (हिं.स.) : अलिबाग : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अलिबाग तालुक्यात पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) यांच्या वतीने समुद्रकिनारे आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी चार मोठ्या आकाराच्या बाटली संकलन बिन्सचे वितरण करण्यात आले.
किहीम, नागाव आणि वरसोली या समुद्रकिनाऱ्यांवर प्रत्येकी एक तसेच अलिबाग एसटी बसस्थानक परिसरात एक अशा एकूण चार बाटली संकलन बिन्स बसविण्यात आल्या आहेत. प्लास्टिक बाटल्यांचा वाढता कचरा आणि त्याचा सागरी जीवसृष्टीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन हा उपक्रम सामाजिक उत्तरदायित्वातून राबविण्यात आल्याचे आरसीएफकडून सांगण्यात आले.या बिन्समुळे प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होऊन परिसर अधिक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, रायगड जिल्हा परिषद परिसरात अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कुंटेबाग परिसरात नारळ, बांबू आणि सुपारीच्या रोपांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी बोलताना वाकडीकर यांनी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याची निगा राखावी, असे आवाहन केले. गेल्या वर्षी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुमारे अडीच लाख रोपांची लागवड करण्यात आली होती, तर यंदाही मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)